Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दोन्ही राष्ट्रवादीची अचानक बैठक, कोअर कमिटीनं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण काय?

दोन्ही राष्ट्रवादीची अचानक बैठक, कोअर कमिटीनं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण काय?



मुंबई : खरा पंचनामा 

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एकाच वेळी मोठ्या आणि वेगवान घडामोडी समोर आल्याने राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे सर्व दिग्गज नेते तडकाफडकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी भेटीसाठी दाखल झाले.

एकीकडे अजित पवार गटाच्या घडामोडी सुरू असतानाच, दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचीही एक महत्त्वाची बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे "दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार का?" या चर्चेने राजकीय वर्तुळात चांगलाच जोर धरला आहे.

काही दिवसांपूर्वीच सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून देत आहे. विशेष म्हणजे, या महत्त्वाच्या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीतील सर्वच दिग्गज नेते उपस्थित होते. मागील काही दिवसांतील या वेगवान घडामोडींनंतर, ही भेट नेमकी अर्थ खात्याच्या संदर्भात होती की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीकरणाबाबत? यावरून तर्क-वितर्काना उधाण आले आहे. वर्षा बंगल्यावरील या भेटीमुळे राज्यातील राजकीय समीकरणे पुन्हा बदलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची कोअर कमिटीची बैठक आटोपल्यानंतर पक्षातील प्रमुख नेते थेट वर्षा निवासस्थानी पोहोचले. यामध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, छगन भुजबळ आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक बड्या नेत्यांचा समावेश होता. अर्थखात्याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आणि त्यावर रणनीती ठरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे.

या घडामोडींमध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, कोअर कमिटीची बैठक आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील (अजित पवार गट आणि शरद पवार गट) काही प्रमुख नेत्यांमध्ये एक 'गुप्त बैठक' झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या गुप्त बैठकीच्या वृत्तामुळे दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या शक्यतांवर पुन्हा एकदा उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. आता या सर्व घडामोडींनंतर दोन्ही गटांकडून काय अधिकृत भूमिका मांडली जाते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.