गुंडेवाडी येथील खून प्रकरणातील आरोपी तात्काळ जेरबंद;
स्थानिक गुन्हे अन्वेषण व मिरज ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील गुंडेवाडी येथे घडलेल्या खूनाच्या गुन्ह्यातील आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि मिरज ग्रामीण पोलिसांनी अवघ्या काही तासांत जेरबंद केले आहे. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास गुंडेवाडी गावातील सातपुते मळा, ग्रीन हाऊस जवळ सुनिल उर्फ सोन्या तानाजी खांडेकर (वय ३१ वर्षे) यांच्यावर अज्ञात कारणावरून धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे आणि मिरज ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अमित पाटील यांनी तपासाची चक्रे वेगाने हलवली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथकांनी बातमीदारांच्या व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला असता, अंकली फाटा ते हरीपूर जाणाऱ्या रस्त्यावर आरोपी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
त्यानुसार साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांच्या पथकाने तात्काळ सापळा रचून संशयित आरोपी अनिरुद्ध सिद्धू कांबळे (वय १९ वर्षे, रा. गुंडेवाडी) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता, मयत सुनील खांडेकर याच्यासोबत वारंवार होणाऱ्या भांडणांच्या रागातून व पूर्वद्वेषातून त्याने आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालकाने मिळून सुनील खांडेकर यांच्यावर चाकू व कोयत्याने वार करून खून केल्याची कबुली दिली. या प्रकरणातील मुख्य आरोपी अनिरुद्ध कांबळे यास पुढील तपासकामी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक अमित पाटील करीत आहेत.
एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, मिरज ग्रामीणचे निरीक्षक अमित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार, उप-निरीक्षक कुमार पाटील, उप-निरीक्षक महादेव पोवार, सुभाष सुर्यवंशी, सुशिल मस्के, अमोल ऐदाळे, इम्रान मुल्ला, सागर लवटे, संदीप नलवडे, नागेश खरात, राजाराम मुळे, ऋतुराज होळकर, विनायक सुतार, विनायक सनदी, सुमीत सुर्यवंशी, प्रमोद साखरपे, मिरज ग्रामीण ठाण्याचे हेमंत ओमासे, शशीकांत जाधव, विकास भोसले, सायबरचे कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.