टायगरवर गोळीबार करून तिघांनी काय केले? मुंबई पोलिसांनी सांगितला प्रत्येक मिनिटाचा घटनाक्रम; थरारक पाठलाग अन् कशी केली अटक
मुंबई : खरा पंचनामा
अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील तीन आरोपींना राजस्थानमधील कोटा येथून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोळीबार केल्यानंतर आरोपी मुंबईतून पळून गेले होते.
त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि राजस्थान पोलिसांच्या मदतीने त्यांना ताब्यात घेतले. आरोपींना पुढील तपासासाठी मुंबईत आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाकडून केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टायगर श्रॉफ याच्यावर संध्याकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. हल्लेखोरांनी या वेळी 5 ते 6 राऊंड फायर केले. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून दुचाकीवरून पसार झाले. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर गोळीबारासाठी वापरण्यात आलेली दुचाकी अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ आढळून आली. या दुचाकीच्या आधारे आणि इतर माहितीच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली.
तपासादरम्यान आरोपी सुरतच्या दिशेने गेल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर ते पुणे-जयपूर एक्स्प्रेसने पुढील प्रवास करत असल्याची माहिती समोर आली. मुंबई पोलिस आरोपींच्या मागावर होते. आरोपी सुरतहून राजस्थानच्या दिशेने जात मागावर होते. आरोपी सुरतहून राजस्थानच्या दिशेने जात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी राजस्थान पोलिसांशी संपर्क साधला. आरोपींबाबतची माहिती कोटा पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर कोटा पोलिसांच्या मदतीने तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांचे पथकही कोटा येथे पोहोचले असून, आरोपींना मुंबईत आणण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींपैकी एक जण बिहारमधील, तर दोघे हरियाणातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींपैकी दोघांचे बारावीपर्यंत, तर एकाचे नववीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांचे वयही कमी असल्याचे समोर आले आहे. दोन आरोपी 18 वर्षांचे, तर तिसरा आरोपी 22 वर्षांचा आहे. या आरोपींनी टायगर श्रॉफ याच्या घराची अनेकदा रेकी केल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. त्यामुळे हा गोळीबार पूर्वनियोजित होता का आणि त्यामागे नेमका कोणाचा हात आहे, याचा तपास पोलिस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींविरोधात हत्येच्या कटासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबारामागील उद्देश काय होता, आरोपींना कोणी सूचना दिल्या होत्या का आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे. टायगर श्रॉफ याच्या घराची वारंवार रेकी का करण्यात आली, याचाही तपास केला जात आहे. या प्रकरणात खंडणीचा काही संबंध आहे का, यासह विविध शक्यतांचा तपास यंत्रणा तपास करत आहेत.
गोळीबार केल्यानंतर आरोपींनी मुंबईतून नेपाळला पळून जाण्याची योजना आखल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र त्याआधीच मुंबई पोलिसांनी त्यांचा माग काढत राजस्थानमधील कोटा येथे त्यांना अटक केली. आता आरोपींना मुंबईत आणल्यानंतर त्यांची चौकशी केली जाणार आहे. या चौकशीत गोळीबाराचा कट कसा रचण्यात आला, हल्ल्यासाठी कोणती शस्त्रे वापरण्यात आली आणि या घटनेमागील नेमके कारण काय, याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
