Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पूर्णेकर यांच्या हत्येचे कोडे २० दिवसानंतरही सुटेना ; हत्येचे कारण आणि सूत्रधार शोधण्यात पोलिसांना अपयश ?

पूर्णेकर यांच्या हत्येचे कोडे २० दिवसानंतरही सुटेना ; हत्येचे कारण आणि सूत्रधार शोधण्यात पोलिसांना अपयश ?

ठाणे : खरा पंचनामा 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णकर यांच्या हत्येला २० दिवस उलटूनही या गुन्ह्यामागील कारण आणि मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

या हत्येमागे मुख्य सूत्रधार असण्याची शक्यता असून, त्याचा शोध घ्यायचा असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी ठाणे न्यायालयात सांगितले होते. मात्र, या प्रकरणात अटक केलेल्या तीन आरोपींची १३ ते १४ दिवस पोलीस कोठडीत चौकशी करूनही हत्येमागील नेमके कारण आणि सूत्रधारापर्यंत पोलीस पोहचू शकले नाहीत. त्यामुळे या हत्येचे गूढ अधिकच वाढले आहे.

प्रदीप पूर्णेकर यांची २९ सप्टेंबर रोजी मानपाडा येथील त्यांच्या कार्यालयात पाच जणांनी शिरुन त्यांची गोळ्या झाडून आणि चॉपरने वार करून निघृण हत्या केली होती. या घटनेमुळे ठाण्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. हत्येच्या दुसऱ्याच दिवशी, ३० सप्टेंबरला ठाणे पोलिसांनी सुभाष शिंदे उर्फ पप्या याला अटक केली. त्यानंतर २ ऑक्टोबर रोजी निखिल यादव आणि नितेश पवार यांना अटक करण्यात आली. या हत्याकांडाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली होती. या प्रकरणातील फरार आरोपी संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि त्याचा साथीदार अमित सिंह यांना अटक केल्यानंतरच हत्येमागील कारण स्पष्ट होऊ शकेल, असे पोलिसांकडून वारंवार सांगण्यात येत होते. अखेर ९ ऑक्टोबर रोजी ठाणे पोलिसांच्या युनिट पाचच्या पथकाने संतोष कनोजिया आणि अमित सिंह या दोघांना अटक केली. त्यानंतर खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी आरोपींची समोरासमोर चौकशी केली. मात्र, या चौकशीतूनही पोलिसांच्या हाती हत्येमागील कारण किंवा मुख्य सूत्रधाराबाबत ठोस माहिती लागलेली नाही.

मुख्य सूत्रधाराचा शोध घ्यायचा असल्याचे खंडणीविरोधी पथकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी आरोपींची पोलीस कोठडी मागताना न्यायालयात सांगितले होते. मात्र, हत्येला २० दिवस उलटूनही मुख्य सूत्रधार कोण आणि हत्येमागील नेमके कारण काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे या हत्याकांडाचे गूढ कायम आहे. चौकट ठाणे न्यायालयात आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी करताना पोलिसांनी काही मुद्दे मांडले होते. आरोपी तपासात सहकार्य करत नसून, या हत्येमागे मुख्य सूत्रधार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अनुषंगाने तपास करणे आवश्यक आहे. तसेच, आरोपींकडून एकच पिस्तूल जप्त करण्यात आले असून, उर्वरित एक पिस्तूल आणि तीन चॉपर जप्त करायचे आहेत, असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले होते. या प्रकरणात सुभाष शिंदे उर्फ पप्या याची पूर्ण १४ दिवस, तर नितेश पवार आणि निखिल यादव यांची १३ दिवस कोठडी पोलिसांना मिळाली होती. परंतु तिघांच्या कोठडीत तपासासाठीची ठोस माहिती मिळविणे पोलिसांना शक्य झाले नाही. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने हे तिघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यामुळे सध्या संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि अमित सिंह या दोघांचीच कोठडी पोलिसांकडे आहे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या उर्वरित आरोपींची पुन्हा चौकशी करायची असल्यास पोलिसांना न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येमागील कारण आणि मुख्य सूत्रधाराचा शोध कधी लागणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.