निरोगी पिढीसाठी ज्ञानगंगा वाचनालयाचा पुढाकार; तरुणाई सायकलिंगकडे वळली
ज्ञानगंगा वाचनालयाचा आरोग्यदायी जीवनशैलीसाठी ‘संडे ऑन सायकल’ उपक्रम
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
निरोगी शरीर, प्रसन्न मन आणि सुदृढ समाजाच्या निर्मितीसाठी नियमित व्यायामाचे महत्त्व लक्षात घेऊन पाडळी येथे ज्ञानगंगा वाचनालय व ग्रंथालयाच्या वतीने ‘संडे ऑन सायकल’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जून महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या सायकलिंग उपक्रमापासून प्रेरणा घेऊन हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनात शारीरिक हालचालींचा अभाव, वाढता मोबाईलचा वापर आणि बदलती जीवनशैली यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी, तरुणांनी आरोग्याबाबत जागरूक व्हावे आणि विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच व्यायामाची सवय रुजावी, या उद्देशाने ज्ञानगंगा वाचनालयाने हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमास प्रवीण सपकाळ शेठ,शरद शिंदे, शेखर शिंदे, कालिदास खंडागळे यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
या उपक्रमांतर्गत पाडळी- धामणी-बामणी परिसरातील तरुण मुले, शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी दर रविवारी पहाटे एकत्र येऊन सायकलिंगचा आनंद घेत आहेत. परिसरातील निसर्गरम्य आणि धार्मिक महत्त्व असलेल्या विविध स्थळांना सायकलने भेट देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये पारे येथील दरगोबा मंदिर, हातनूर येथील श्री क्षेत्र होनाई मंदिर, मंगरूळ येथील साऊबाई मंदिर तसेच रेवणसिद्ध मंदिर या ठिकाणांचा समावेश आहे. तसेच यापुढेही या ठिकाणाबरोबर आरवडे येथील इस्कॉन मंदिर, विटा येथील श्री स्वामी समर्थ मंदिर, तासगाव येथील गणपती मंदिर या ठिकाणीदेखील आयोजन करण्यात येणार आहे.
सायकलिंगमधून आरोग्याचा संदेश!
ज्ञानगंगा वाचनालय व ग्रंथालय, पाडळी यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘संडे ऑन सायकल’ उपक्रमात तरुण व शालेय विद्यार्थी उत्साहाने सहभागी होत आहेत. दर रविवारी पहाटे परिसरातील धार्मिक व पर्यटनस्थळांना सायकलने भेट देत व्यायाम, पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला जात आहे. - किरण पाटील
ज्ञानगंगा वाचनालय व ग्रंथालय, पाडळी
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.