विनापरवाना पिस्टलसह रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद
सांगलीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
सांगली जिल्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत विनापरवाना अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या एका रेकॉर्डवरील आरोपीस ताब्यात घेतले आहे. ही कारवाई ईश्वरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली असून, आरोपीकडून ८१,००० रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
सांगली जिल्ह्यात गुन्हेगारीला प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या होत्या. या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या हाताखालील पथक सक्रिय होते. दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील अंमलदारांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, ईश्वरपूरमधील बंद पडलेल्या जलतरण तलावासमोर रेकॉर्डवरील एक आरोपी कमरेला पिस्टल लावून उभा आहे.
या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या पथकाने तात्काळ संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली. संशयितरीत्या थांबलेल्या इसमाची झडती घेतली असता, तो अबुबकर हारुणरशीद मणेर (वय २६ वर्षे, रा. मणेर गल्ली, गांधी चौक, ईश्वरपूर, ता. वाळवा, जि. सांगली) असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या अंगझडतीत पाठीमागील बाजूस विनापरवाना देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. हे शस्त्र स्वतःच्या सुरक्षेसाठी विकत घेतल्याची कबुली आरोपीने दिली असून, त्याच्यावर ईश्वरपूर पोलीस ठाण्यात आर्म्स कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीवर यापूर्वीही आर्म्स ॲक्ट आणि घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. जिल्ह्यातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर अशाच प्रकारची प्रभावी कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून देण्यात आली आहे.
एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजेंद्र यादव, संजय पाटील, हणमंत लोहार, अतुल माने, अरुण पाटील, संकेत कानडे, विजय पाटणकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.