Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राष्ट्रीय व राज्य लॉन टेनिस स्पर्धेत सांगलीचा डंकानमन शहाचा दुहेरी मुकुट, भार्गवी भोसलेचेही विजेतेपद

राष्ट्रीय व राज्य लॉन टेनिस स्पर्धेत सांगलीचा डंका
नमन शहाचा दुहेरी मुकुट, भार्गवी भोसलेचेही विजेतेपद

पूजा फडके 
​सांगली : खरा पंचनामा 

राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय लॉन टेनिस स्पर्धांमध्ये सांगलीच्या बाल खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत शहराच्या क्रीडा वैभवात भर घातली आहे. बेळगाव येथील इंडियन स्पोर्ट्स क्लब येथे पार पडलेल्या अखिल भारतीय लॉन टेनिस असोसिएशन (AITA) आणि कर्नाटक राज्य लॉन टेनिस असोसिएशन (KSLTA) आयोजित नॅशनल सिरीज अंडर-१६ स्पर्धेत सांगलीच्या नमन हर्षल शहा याने एकेरी आणि दुहेरी दोन्ही गटांत अजिंक्यपद मिळवून दुहेरी मुकुट पटकावला. त्याचप्रमाणे बीड येथे झालेल्या राज्य मानांकन स्पर्धेत सांगलीच्याच भार्गवी पवन भोसले हिने अंडर-१० मुलींच्या गटात विजेतेपद संपादन केले.
​
बेळगाव येथील नॅशनल सिरीज अंडर-१६ स्पर्धेच्या मुलांच्या एकेरी अंतिम सामन्यात नमन शहा याने तमिळनाडूच्या अमन मिमाने याचा ६-३, ६-३ असा सरळ सेट्समध्ये पराभव करत राष्ट्रीय चषकावर आपले नाव कोरले. यानंतर रंगलेल्या दुहेरीच्या अंतिम सामन्यात नमन शहा आणि तनय पै या जोडीने तमिळनाडूच्याच अमन मिमाने आणि अश्विन बालाजी या जोडीचा ६-४, ६-३ असा पराभव करत दुहेरीचे विजेतेपदही आपल्या नावे केले.

​दुसऱ्या बाजूला, महाराष्ट्र लॉन टेनिस असोसिएशन (MSLTA) आणि चंपावती क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बीड येथे आयोजित राज्य मानांकन स्पर्धेत भार्गवी भोसले हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. अंडर-१० मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात भार्गवीने छत्रपती संभाजीनगरच्या हृदिनी त्रिभुवन हिचा ४-१, ४-१ असा एकतर्फी पराभव करत राज्यस्तरीय विजेतेपदाला गवसणी घातली.

​नमन शहा आणि भार्गवी भोसले हे दोन्ही खेळाडू सांगलीतील ग. आ. कॉलेज ऑफ कॉमर्स आणि विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत. हे दोन्ही बाल खेळाडू आमराई ऑफिसर्स क्लब येथील श्रेया पै टेनिस अकॅडमी येथे राष्ट्रीय प्रशिक्षक रविंद्र कदम, सोनू तोडू, दत्ता पै आणि निलेश बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली टेनिसचे प्रशिक्षण घेत आहेत. त्यांच्या या नेत्रदीपक यशाबद्दल सांगलीतील क्रीडाप्रेमींसह विविध क्षेत्रांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.