Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

डफळापूर येथील आप्पासो चव्हाण यांच्या हत्येचा उलगडाअनैतिक संबंधातून पत्नी व प्रियकराने १ लाखांची सुपारी देऊन घडवून आणला खून

डफळापूर येथील आप्पासो चव्हाण यांच्या हत्येचा उलगडा
अनैतिक संबंधातून पत्नी व प्रियकराने १ लाखांची सुपारी देऊन घडवून आणला खून

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील डफळापूर येथे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा बनाव रचून घडवून आणलेला आप्पासो लक्ष्मण चव्हाण (वय ५०) यांचा खून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) उघडकीस आणला आहे. अनैतिक संबंधांच्या अडसर ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीने प्रियकराच्या मदतीने १ लाख रुपयांची सुपारी देऊन ही हत्या घडवून आणल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी सांगली एलसीबीने आरोपी प्रियकर गंगाधर रामू तेली, सुपारी घेणारे साथीदार विक्रांत सर्जेराव चव्हाण व प्रतीक लक्ष्मण मोकाशी, तसेच मृत व्यक्तीची पत्नी सुनिता चव्हाण व एका विधीसंघर्षग्रस्त बालिकेला ताब्यात घेतले आहे.

घटनावृत्तानुसार, २२ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री डफळापूर येथील परोळेकर वस्तीवर राहणारे आप्पासो चव्हाण हे घरात अचानक बेशुद्ध पडल्याचे सांगत, त्यांची पत्नी सुनिता आणि मुलीने नातेवाईकांच्या मदतीने त्यांना जत येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे भासवून नातेवाईकांनी शवविच्छेदन न करताच अंत्यसंस्कार केले होते. मात्र, एलसीबीचे पोलीस अंमलदार अमिरशा फकीर व संदीप नलावडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आप्पासो यांचा मृत्यू नैसर्गिक नसून गावातील गंगाधर तेली, त्याचे साथीदार, पत्नी आणि मुलगी यांनी मिळून गळा आवळून खून केल्याची माहिती समोर आली.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांच्या पथकाने संशयित गंगाधर तेली याला ताब्यात घेऊन चौकशी केली.

चौकशीदरम्यान गंगाधरने गुन्ह्याची कबुली दिली. गंगाधर हा आप्पासो यांचा वर्गमित्र असल्याने गेल्या २० वर्षांपासून त्याचे घरी येणे-जाणे होते, ज्यातून त्याचे आप्पासो यांची पत्नी सुनिता हिच्याशी अनैतिक संबंध निर्माण झाले. यावरून आप्पासो हे पत्नीवर संशय घेऊन तिला सतत मारहाण व त्रास देत असल्याने सुनिताने गंगाधरकडे पतीचा काटा काढण्याचा हट्ट धरला होता.

पतीची हत्या करण्यासाठी गंगाधरने कवठेमहांकाळ तालुक्यातील कोकळे येथील ओळखीच्या विक्रांत चव्हाण आणि प्रतीक मोकाशी यांना १ लाख रुपयांची सुपारी दिली. ठरल्याप्रमाणे २२ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास आरोपींनी आप्पासो यांच्या घरात प्रवेश केला. त्यावेळी प्रतीकने आप्पासो यांचे पाय धरले, विक्रांतने हात पकडले आणि गंगाधरने तोंडावर उशी दाबून गळा आवळत त्यांचा जीव घेतला. याप्रकरणी मनोजकुमार तानाजी जाधव यांच्या फिर्यादीवरून जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना पुढील कारवाईसाठी जत पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रशांत निशाणदार, सुभाष सुर्यवंशी, अमित परिट, अमिरशा फकीर, संदीप नलावडे, नागेश खरात, अमर नरळे, सोमनाथ गुंडे, सागर लवटे, अनिल कोळेकर, सागर टिंगरे, दरिबा बंडगर, सतिश माने, महादेव नागणे, संदीप गुरव, उदय माळी, मोतीराम खोत, सुनिता शेजाळे, विनायक सुतार, विक्रम खोत, केरुबा चव्हाण, कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर, अजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.