ग्रामपंचायत कार्यालयात महिला कर्मचाऱ्याचा खून, प्रेमसंबंधातील संशयातून थरार; संशयित पोलिसांच्या ताब्यात
अहिल्यानगर : खरा पंचनामा
जिल्ह्यातील भिंगार परिसरातील वडारवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालयात आज सकाळी महिला कर्मचाऱ्यावर लोखंडी रॉड आणि चाकूने हल्ला करण्यात आला. यात डोके, गळय़ावर गंभीर वार करण्यात आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेने खळबळ उडाली असून, संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, प्रेमसंबंधातून निर्माण झालेला संशयातून हा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
अनिता आळकुटे असे मृत महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्या वडारवाडी ग्रामपंचायतीत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या. या प्रकरणातील संशयित आरोपी संतोष नाना धोत्रे (वय 49) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
वडारवाडी ग्रामपंचायत कार्यालयात आज सकाळी साडेसातच्या सुमारास अनिता आळकुटे यांच्यावर चाकू आणि लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
अनिता आळकुटे आणि संतोष धोत्रे यांच्यात गेल्या दहा वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे सांगितले जात आहे. धोत्रे हा पत्नीपासून वेगळा राहत असून, त्याच्या घटस्फोटाची प्रक्रिया न्यायालयात सुरू आहे. तर अनिता आळकुटे यांचे पती मयत आहेत. अनिता यांचे अन्य एका व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याची माहिती संतोष धोत्रे याला मिळाल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. याच संशयातून धोत्रे याने अनिता यांच्यावर हल्ला केल्याची माहिती तपासात समोर येत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
