विनयभंग करणाऱ्या नराधमाला एक वर्ष सक्तमजुरी आणि दंड
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
सांगली जिल्ह्यातील मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला न्यायालयाने दंडासह सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. अक्षय सागर पाटील (वय २८, रा. शारदा नगर, कुपवाड रोड, मिरज) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
ही घटना २८ एप्रिल २०२३ रोजी घडली होती, जिथे पीडिता ही गुरुकुल आयुर्वेदिक दुकानात पाठदुखी व मानदुखीवरील औषधे आणण्यासाठी गेली असताना आरोपी अक्षय पाटील याने तिचा हात धरून छेडछाड केली आणि तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ आणि ३५४ (अ) (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि मिरज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी तथा सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी तपासाबाबत योग्य सूचना दिल्या होत्या. या गुन्ह्याचे तपासी अंमलदार तथा पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन कुंभार यांनी या प्रकरणाचा सखोल व उत्कृष्ट तपास करून न्यायालयात वेळेत दोषारोपपत्र दाखल केले होते.
न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू असताना विविध साक्षीदार तपासून १७ ऑक्टोबर २०२६ रोजी न्यायालयाने अंतिम सुनावणी पूर्ण केली. उपलब्ध पुरावे आणि साक्षींच्या आधारे न्यायालयाने आरोपी अक्षय सागर पाटील यास दोषी ठरवून १ वर्ष सक्त कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या यशस्वी तपासात व खटल्याच्या कामकाजात कोर्ट पैरवी अधिकारी तथा पोलीस हेडकॉन्स्टेबल पुंडलीक कांबळे यांचेही सहकार्य लाभले. महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांच्या उत्कृष्ट तपासामुळे आरोपीला शिक्षा मिळाल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.