वयोवृद्ध इसमाला लुटणाऱ्या चोरास जेरबंद करत २ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात बोलण्याचा बहाणा करून एका वयोवृद्ध इसमाला लुटत जबरी चोरी करणाऱ्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले आहे. या प्रकरणी एकूण दोन लाख अठ्ठावीस हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक ५ ऑक्टोबर २०२६ रोजी फिर्यादी सयाप्पा ईश्वरा ओलेकर हे शेगाव गावाकडून रेवनाळरोडवरील शेताजवळ आले असता, पांढऱ्या रंगाच्या स्कुटीवरून आलेल्या दोन अज्ञात जणांनी त्यांच्याशी बोलण्याचा बहाणा केला. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील बदाम सोन्याची पेटी आणि कानातील हुडकी असे सोन्याचे दागिने बळचोराने काढून घेत त्यांची चोरी केली व आरोपी पसार झाले. या घटनेप्रकरणी जत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिेतेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी एक विशेष पथक नेमले होते.
तपासादरम्यान मिळालेल्या तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांच्या आधारे, हा गुन्हा पंढरपूर येथील आशु जाधव आणि त्याचा साथीदार सोमनाथ पोरे यांनी केल्याचे निष्पन्न झाले.
पथकाने संशयित आरोपी दत्ता जाधव (आशु जाधव) यास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने व त्याच्या साथीदाराने मिळून हा गुन्हा केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात चोरी केलेले नऊ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यासाठी वापरलेली एक सुझुकी एक्सेस मोटारसायकल असा एकूण दोन लाख अठ्ठावीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी धोंडीराम पोरे हा परागंदा असून, अटक करण्यात आलेला आरोपी आणि जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पुढील तपासकामी जत पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.