Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

९ वर्षांपासून चकवा देणारा फरार आरोपी अखेर जेरबंद; मिरज ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

९ वर्षांपासून चकवा देणारा फरार आरोपी अखेर जेरबंद; मिरज ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

पूजा फडके 
सांगली/मिरज : खरा पंचनामा 

सन २०१७ मधील दरोड्याच्या प्रयत्न प्रकरणातील गेल्या नऊ वर्षांपासून पोलिसांना चकवा देत फरार असलेला कुप्रसिद्ध आरोपी अनुसेन उर्फ अनुराग शंकर पवार (वय ३२, रा. नरवाड रोड, आरग, ता. मिरज, जि. सांगली) याला मिरज ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी आरग बस स्टँड परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले असून, या कारवाईमुळे नऊ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

२९ जानेवारी २०१७ रोजी बेळकी येथील श्रीराम पेट्रोलपंपाजवळ दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीविरोधात मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३९९, ४०२ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात यापूर्वी विशाल बाळासो रुपनर, विकास कैलास वजाळे, आप्पा पांडुरंग पवार आणि सिडलेस आनंदा काळे या चार आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र, आरोपी अनुसेन उर्फ अनुराग पवार हा घटनेच्या वेळेपासून पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला होता.

सांगली जिल्ह्यातील पाहिजे फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ दरम्यान विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील यांनी फरार आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक तयार केले होते. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी गस्तीदरम्यान पथकाला बातमीदाराकडून माहिती मिळाली की, फरार आरोपी अनुराग पवार हा आरग बस स्टँडजवळ आला आहे.

 मिळालेल्या बातमीनुसार पथकाने तत्काळ सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने पूर्वीच्या गुन्ह्याची आणि परांगदा असल्याची कबुली दिली. पोलिसांकडून त्यास अटक करण्यात आली असून न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रियंका वाकळे, हेमंत ओमासे, शशिकांत जाधव, विकास भोसले व पथकाने केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.