Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मिरजेत विनापरवाना २ देशी पिस्तुल आणि कारसह दोघांना अटकस्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

मिरजेत विनापरवाना २ देशी पिस्तुल आणि कारसह दोघांना अटक
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

सांगली येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने मिरजेत विशेष मोहीम राबवून विनापरवाना दोन देशी बनावटीची पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आणि एक चारचाकी वाहन असा एकूण ९ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना जागीच ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून, त्यांना पिस्तूल पुरवणाऱ्या कर्नाटकातील एका आरोपीविरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे व पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या पथकाने जिल्ह्यात अवैध शस्त्रांविरुद्ध मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान भारतनगर ख्रिश्चन दफनभूमी परिसरात एका काळ्या रंगाच्या हुंदाई व्हेन्यू चारचाकी वाहनात (क्रमांक MH 10 ER 1009) दोन संशयित इसम कमरेला पिस्तूल लावून बसले असल्याची गुप्त माहिती पोलीस अंमलदार अमोल ऐदाळे आणि रोहन घस्ते यांना मिळाली. माहिती मिळताच पथकाने पंचांसमक्ष छापा टाकून वाहनातील दोन्ही इसमांना ताब्यात घेतले.
तपासणीदरम्यान दर्शन अनिल कांबळे (वय २६, रा. ईदगाहनगर झोपडपट्टी, मिरज) आणि शेखर महावीर लोंढे (वय २९, रा. माजी सैनिक वसाहत, सहयाद्रीनगर, मिरज) यांच्याकडून प्रत्येकी एक देशी बनावटीचे पिस्तूल व मॅगझिनमध्ये प्रत्येकी एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले. चौकशीत संशयितांकडे या शस्त्रांचा कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. आरोपी शेखर लोंढे याने ही पिस्तूले कोप्पल (जि. गदग, कर्नाटक) येथील आकाश ढिगे याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली.

या कारवाईत १ लाख रुपये किमतीची २ पिस्तूले, १ हजार रुपये किमतीची २ जिवंत काडतुसे आणि ८ लाख रुपये किमतीची व्हेन्यू कार असा ९ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार रोहन घस्ते यांच्या फिर्यादीवरून महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे करत आहे.

एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उप-निरीक्षक महादेव पोवार, अमित परीट, अनिल ऐनापुरे, अमोल ऐदाळे, सोमनाथ गुंडे, प्रकाश पाटील, रणजित जाधव, श्रीधर बागडी, रोहन घस्ते, संकेत कानडे, अभिजीत माळकर, विनायक सनदी, ऋषिकेश सदामते, कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर, अजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.