सांगली स्पोर्ट्स फाऊंडेशनचे २० खेळाडू शालेय विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धेस रवाना
सांगली : खरा पंचनामा
नुकत्याच पार पडलेल्या शालेय मनपा व ग्रामीण क्रीडा स्पर्धेत सांगली स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या खेळाडूंनी विविध वयोगटांत आणि क्रीडा प्रकारांत चमकदार कामगिरी करत नेत्रदीपक यश संपादन केले आहे. या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर फाऊंडेशनच्या तब्बल २० खेळाडूंची चिपळूण येथील डेरवण येथे २९ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या शालेय विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली असून सर्व खेळाडू स्पर्धेसाठी रवाना झाले आहेत.
या निवड झालेल्या खेळाडूंमध्ये १४ वर्षाखालील मुलांच्या गटात प्रथमेश काळेल व यशवर्धन बुटाले तर मुलींच्या गटात दुर्वा मठद हिने बाजी मारली आहे. १७ वर्षाखालील मुलांच्या गटात श्रेयान पाटील, आर्यन आवटी, ऋषभ रेळेकर, अखिलेश पारसे, दया कदम आणि वीर गोंदकर यांनी चमकदार कामगिरी केली. याच वयोगटातील मुलींमध्ये आराध्या शिंदे, सई साळुंखे, राजश्री कुदळे व शरयू कदम यांनी विविध धावण्याच्या व उडीच्या प्रकारांत प्राविण्य मिळवले.
तसेच १९ वर्षाखालील मुलांच्या गटात राजवर्धन बर्गे, सिद्धार्थ गरांडे व शौर्य पाटील यांनी अव्वल स्थान पटकावले, तर मुलींच्या गटात जुबिया मुलाणी, सई चौगुले आणि साक्षी कोळेकर यांनी उत्कृष्ट मैदानी कामगिरीच्या जोरावर विभागीय स्पर्धेतील आपले स्थान पक्के केले आहे.
विशेष म्हणजे हे सर्व यशस्वी खेळाडू फाऊंडेशनच्या सकस आहार योजनेचे लाभार्थी आहेत. या खेळाडूंना एस एल पाटील सर, अविनाश सावंत सर आणि मंदार मोकाशी यांचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन लाभले आहे. विभागीय स्पर्धेसाठी रवाना होणाऱ्या सर्व खेळाडूंना सांगली स्पोर्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष मकरंद चितळे, उपाध्यक्ष संजय परमणे आणि खजिनदार प्रमोद शिंदे यांनी मनःपूर्वक शुभेच्छा देऊन त्यांचा उत्साह वाढवला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.