डॉक्टरांच्या सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अभिजित भोसलेला शिक्षा
सांगली : खरा पंचनामा
येथील शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका डॉक्टरच्या सरकारी कामात अडथळा आणून त्यांना धमकी दिल्याप्रकरणी आरोपी अभिजित दत्ताराम भोसले (वय ३१, रा. हनुमाननगर, सांगली) याला सांगली येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती एस. एन. शेट्टे यांच्या न्यायालयाने ६ महिने साधी कैद आणि २,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास आणखी १५ दिवस साधी कैद भोगावी लागेल.
ही घटना १६ ऑगस्ट २०१९ रोजी रात्री ८.३० वाजता सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घडली होती. फिर्यादी डॉक्टर गडदे हे कर्तव्यावर असताना आरोपी अभिजित भोसले याने 'पेशंट शिफ्ट का केला नाही?' या कारणावरून त्यांच्याशी वाद घातला. त्याने पायातील चप्पल काढून त्यांना मारायला आला, त्यांना शिवीगाळ केली आणि 'तुला जिवंत ठेवणार नाही,' अशी धमकी दिली.
याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्यादरम्यान सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता यु. बी. करवदे यांनी ५ साक्षीदार तपासले. यामध्ये डॉक्टर गडदे यांच्यासह प्रत्यक्षदर्शी साक्षीदार डॉक्टर अतुल पवार आणि परिचारिका जयश्री ठोंबरे यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. भोसले यांच्याविरुद्ध सबळ पुरावा आल्यामुळे न्यायालयाने त्यांना दोषी धरून शिक्षा सुनावली. या तपासात विश्रामबाग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि महिला पोलीस नाईक श्रीमती कविता निर्मळे यांनी सहकार्य केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
