पोलीस क्रीडा स्पर्धेत सांगली जिल्ह्याची कुस्तीमध्ये महिला व पुरुष खेळाडूंची चमकदार कामगिरी
बालेवाडीतील राज्य स्पर्धेसाठी निवड
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
सांगली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवत कुस्ती खेळामध्ये सांगलीच्या महिला व पुरुष खेळाडूंनी अभूतपूर्व यश संपादन केले आहे. कुस्तीचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पारंपरिक कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली जिल्ह्याने कुस्तीमध्ये चॅम्पियनशिपचा बहुमान पटकावला आहे. सांगली जिल्हा पोलीस दलाच्या कुस्तीगीर पुरुष संघाने १ गोल्ड, २ सिलव्हर आणि ६ ब्राँझ मेडल मिळवत तिसरी चॅम्पियनशिप आपल्या नावावर केली आहे, तर महिला कुस्तीपटूंनीही दैदिप्यमान कामगिरी करत महिला चॅम्पियनशिपचा किताब पटकावला आहे.
या स्पर्धांमध्ये सांगलीच्या महिला खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची लयलूट केली आहे. ५० किलो वजनी गटात दिपाली केंद्र, ५३ किलोमध्ये प्रणाली माळी, ५५ किलोमध्ये संध्या महापुरे, ५९ किलोमध्ये दिपाली नेटके आणि ७२ किलो वजनी गटात जयश्री गडदे यांनी सुवर्णपदक (गोल्ड मेडल) पटकावले. ६८ किलो वजनी गटात गंगा गावडे यांनी रौप्यपदक (सिल्व्हर मेडल), तर ६५ किलोमध्ये माधुरी जांगेवाड आणि ७६ किलो वजनी गटात पाकीजा शेख यांनी कांस्यपदक (ब्राँझ मेडल) आपल्या नावावर केले.
पुरुष कुस्तीगीरांमध्येही सांगली पोलीस दलाच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. शितलराव जाधव यांनी सुवर्णपदक (गोल्ड मेडल) जिंकले, तर विशाल काळे आणि अनंत व्यवहारे यांनी रौप्यपदक (सिल्व्हर मेडल) पटकावले. तसेच अमर करडे, प्रशांत हिप्परकर, वैभव माळी, देविदास जाधव, सचिन पाटील आणि राज मुसळे यांनी कांस्यपदक (ब्राँझ मेडल) मिळवून यश संपादन केले.
खेळाडूंच्या या यशामागे त्यांची कठोर मेहनत, जिद्द आणि संघर्ष फळाला आला आहे. या सर्व यशस्वी कुस्तीगरांना एनआयएस कुस्ती कोच दीपक पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन केले, तर संघ व्यवस्थापक म्हणून शंकर पाटील यांनी आपली जबाबदारी उत्कृष्ट पार पाडली. सांगली जिल्ह्याचा नावलौकिक देशपातळीवर उंचावणाऱ्या या सर्व खेळाडूंचे आणि मार्गदर्शकांचे सांगलीचे माननीय पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी विशेष अभिनंदन केले आहे. या सर्व उत्कृष्ट खेळाडूंची आता पुणे येथील बालेवाडी येथे आयोजित ३७ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली असून, संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.