पुरुषांत कोल्हापूर तर महिलांमध्ये साताऱ्याला जनरल चॅम्पियनशिप
दोन्ही गटात सांगलीला उपविजेतेपद : परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धांचा समारोप
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
गेल्या पाच दिवसांपासून अत्यंत उत्साहात सुरू असलेल्या परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धांचा आज सांगलीत शानदार समारोप झाला. या क्रीडा महोत्सवात संपूर्ण परिक्षेत्रातून आलेल्या तब्बल १,१५० खेळाडूंनी विविध खेळांमध्ये आपल्या क्रीडा कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन घडवले. या चुरशीच्या स्पर्धेत पुरुष गटात कोल्हापूरच्या संघाने चमकदार कामगिरी करत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले, तर महिला गटात साताऱ्याच्या संघाने बाजी मारत सर्वसाधारण विजेतेपदावर आपले नाव कोरले.
मुख्य विजेतेपदाने हुलकावणी दिली असली, तरी यजमान सांगलीच्या खेळाडूंनी घरच्या मैदानावर प्रेक्षकांची मने जिंकली. सांगलीच्या पुरुष आणि महिला अशा दोन्ही संघांनी संपूर्ण स्पर्धेत झुंजार खेळ करत मानाचे उपविजेतेपद आपल्या नावावर केले. खेळाडूंनी वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये दाखवलेले चापल्य, सांघिक भावना आणि अभूतपूर्व जिद्द यामुळे या स्पर्धा क्रीडाप्रेमींसाठी एक पर्वणीच ठरल्या.
आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि विशेष पोलिस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. यावेळी सोलापूरचे आयुक्त एम. राजकुमार, कोल्हापूरचे अधीक्षक निलोत्पल, साताराचे अधीक्षक निखील पिंगळे, सोलापूर ग्रामीणचे अधीक्षक अतुल कुलकर्णी, पुणे ग्रामीणचे अधीक्षक संदीपसिंग गिल्ल, तसेच उद्योजक श्रीकांत तारळेकर आणि गिरीष चितळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाची सुरुवात सांगलीचे अधीक्षक तुषार दोशी यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यानंतर मनोगत व्यक्त करताना आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. तुमच्या अंगावर वर्दी आहे त्यामुळे तुमचा नेहमीच सन्मान होत असेल, परंतु तुमच्या पुढील पिढीला मैदानाची गोडी लावण्यासाठी तुम्हीच प्रयत्न करण्याची गरज आहे, असे आवाहन त्यांनी केले. विशेष पोलिस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच राज्यस्तरीय स्पर्धेसाठी विशेष सवलत जाहीर केली.
पोलिस मैदानावर सर्व संघांनी उत्कृष्ट संचलन करून उपस्थितांची मने जिंकली, ज्यानंतर उपस्थितांनी मोठा जल्लोष केला. अपर अधीक्षक कल्पना बारावकर यांनी आलेल्या मान्यवरांचे आभार मानले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.