महागडे मोबाईल, आलिशान गाड्या घेऊन फिरू नका ! भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसांनी कोणाला सुनावले?
पुणे : खरा पंचनामा
'काम करताना समन्वय साधा, मतदारसंघात फिरताना महागडे मोबाईल, आलिशान गाड्या घेऊन फिरू नका. नागरिकांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी तुम्हाला निवडून दिले आहे. त्याची जाणीव ठेवून काम करा,' अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन विभाग) बी. एल. संतोष यांनी नगरसेवक आणि कोअर कमिटी सदस्यांना बैठकीत सुनावले.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत विधी महाविद्यालय रस्त्यावरील भांडारकर इन्स्टिट्यूट येथील सभागृहात बैठक झाली. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील संघटनात्मक जिल्ह्याची कोअर कमिटी आणि दोन्ही महापालिकांच्या नगरसेवकांचा या बैठकीत समावेश होता.
महापालिकेत सत्ता स्थापन केल्यानंतर आजपर्यंत पुणे शहरात करण्यात आलेल्या कामांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. 'नगरसेवक झालो, म्हणजे जबाबदारी संपली, असे नाही. नागरिकांचे प्रश्न, अडचणी सोडविल्या नाहीत, तर पुन्हा निवडून येताना अडचणी येतील.
प्रभागात नागरिकांशी संवाद कधी साधता, नागरिकांशी बोलताना तुम्ही महागड्या गाड्या, लाखांचे मोबाइल घेऊन फिरू नका, काम करताना कोणी दुखावले, दुरावले गेले आहे का, याची आपल्याला जाणीव आहे का, हा दुरावा दूर होण्यासाठी आपण काही प्रयत्न केले आहेत का,' असे प्रश्न उपस्थित करून संतोष यांनी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
'कोअर कमिटीची बैठक दर महिन्याला झाली पाहिजे, आपली एकमेकांशी ओळख आहे का, महिला लोकप्रतिनिधींना सन्मान द्या,' अशा शब्दांत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
बैठकीत पदाधिकाऱ्यांची ओळख करून देताना महापौर मंजूषा नागपुरे यांची माहिती सांगताच 'नागपुरे' तुम्ही आडनावावरून नागपुरच्या आहात का, असा प्रश्न राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी उपस्थित केला. पुणे पदवीधर निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झाला. पुणे, पिंपरीसह जिल्ह्यात भाजपचे संख्याबळ अधिक असतानाही हा पराभव झाल्याने यावर भाजपच्या बैठकीत चर्चा होईल असे सांगण्यात येत होते. मात्र, या बैठकीत या निवडणुकीत पराभवाबाबत एक शब्दही उच्चारण्यात आला नाही.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
