न्यायधीश बाप अन् पोलिसांनी प्रकरण दडपण्याचा खूप प्रयत्न केला, मर्सिडीज अपघात प्रकरणात हायकोर्टाचाच आदेश
चेरानल्लूर : खरा पंचनामा
अतिरिक्त सत्र न्यायाधीशांच्या १७ वर्षीय मुलाने भरधाव मर्सिडीज कारने स्कूटरला उडवून ५५ वर्षीय व्यक्तीचा बळी घेतल्याच्या प्रकरणाला आता गंभीर वळण लागले आहे. या प्रकरणात केरळ उच्च न्यायालयाने सोमवारी पोलिसांना संबंधित अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशांविरोधात थेट एफआयआर दाखल करण्याची अधिकृत परवानगी दिली आहे. पोलिसांच्या विनंती अर्जावर विचार केल्यानंतर उच्च न्यायालयाने प्रशासकीय पातळीवर हे निर्देश जारी केले.
हा भीषण अपघात रविवारी पहाटे चेरानल्लूर परिसरातील महामार्गावर घडला. ५५ वर्षीय जयबालकृष्णन हे आपला खानावळ /डोसा स्टॉल बंद करून स्कूटरवरून घरी परतत होते. न्यायाधीशांच्या अल्पवयीन मुलाने चालवलेल्या सुसाट मर्सिडीजने त्यांच्या स्कूटरला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की जयबालकृष्णन यांचा जागीच तडफडून मृत्यू झाला.
अल्पवयीन आरोपीला जामीन आणि पुन्हा ताब्यात अपघातानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन किशोर न्याय मंडळासमोर हजर केले होते. तिथे त्याला तात्काळ जामीन मंजूर झाला होता. न्यायाधीशांचा मुलगा असल्याने पोलीस यंत्रणा त्याच्यावर मेहेरबान असल्याचा आरोप करत जयबालकृष्णन यांच्या संतप्त कुटुंबीयांनी चेरानल्लूर पोलीस ठाण्याबाहेर जोरदार निदर्शने आणि ठिय्या आंदोलन केले. वाढता जनक्षोभ पाहून पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाला पुन्हा ताब्यात घेतले.
"वडिलांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील" - मृत जयबालकृष्णन यांच्या मुलीचा निर्धार पत्रकारांशी बोलताना मृत जयबालकृष्णन यांच्या मुलीने पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला. "न्यायाधीश किंवा त्यांच्या मुलाला माझ्या वडिलांच्या मृत्यूची जबाबदारी झटकून पळ काढू देणार नाही. माझा पोलिसांवर अजिबात विश्वास राहिलेला नाही, कारण आरोपी हा न्यायाधीशांचा मुलगा असल्याने त्याला सुरुवातीपासून वाचवण्याचा आणि प्रकरण सौम्य करण्याचा प्रयत्न केला गेला. अल्पवयीन असण्याचा गैरफायदा घेऊन गंभीर गुन्हे करूनही मोकळे सुटण्याची ही प्रवृत्ती आता बंद झालीच पाहिजे."
उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे आता स्वतः न्यायाधीशांवर अल्पवयीन मुलाच्या हातात वाहन देणे आणि मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा नोंदवला जाणार असून, या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.