पुढच्या निवडणुकीत तू कसा निवडून येतो बघतोच ! रोहित पवारांचा सर्वांदेखत अजितदादा स्टाईल इशारा
पुणे : खरा पंचनामा
गेल्या पाच दिवसांपासून पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसोबत आंदोलनाला बसलेल्या आमदार रोहित पवार यांनी भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांना इशारा दिला आहे. 2029 च्या विधानसभा निवडणुकीत विक्रम पाचपुते निवडून येणार नाहीत, हा माझा शब्द आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले. रोहित पवार यांनी सोमवारी पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसमोर बोलताना हे वक्तव्य केले.
काही दिवसांपूर्वी विक्रम पाचपुते यांनी रोहित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. पुण्यातील आंदोलन हे आंदोलन राहिलेले नाही. हे म्हणजे रोहित पवार नाईटस कार्यक्रम सुरु असं म्हणायला हरकत नाही. दिवसभर तिकडे फक्त 50-100 लोक असतात, विद्यार्थ्यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवली आहे. हे राज्याला वेठीला धरण्याचे काम सुरु आहे. रोहित पवार हे एमपीएससी आंदोलनाच्या आडून अर्बन नक्सल तयार करत आहेत, असे विक्रम पाचपुते यांनी म्हटले होते. या टीकेला रोहित पवार यांनी काल सडेतोड प्रत्युत्तर दिले.
अहिल्यानगरमधील एक आमदार आहेत, त्यांना मी माझे मित्र समजत होतो. माझ्यावर टीका करण्याच्या नादात ते तुम्हा सर्वांना, सामान्य परिवारातील मुलांना, शेतकऱ्याच्या मुलांना, अधिकारी स्वप्न व्हायचं स्वप्न उराशी बाळगून असलेल्या गरिबांच्या मुलांना अर्बन नक्सल म्हणाले. या गोष्टीचा मी निषेध करतो आणि तुम्हाला सर्वांना शब्द देतो की, 2029 ला ही व्यक्ती विधानसभेत जाणार नाही, ही माझी जबाबदारी आहे. माझ्या भावाबहिणींना आणि सामान्य लोकांच्या मुलांना तुम्ही अर्बन नक्सल म्हणत असाल तर लाज वाटली पाहिजे तुम्हाला. तुमच्या तोंडातून एखादा शब्द चुकीचा गेला तर तुम्ही माफी मागू शकतो. पण सरळसरळ तुम्ही बोलताय, मी असं बोललोच नाही. तुमचा नेता ज्या पद्धतीने शब्दांचे खेळ करतो, तशी तुम्हाला सवय लागली आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले.
रोहित पवारांचे विक्रम पाचपुतेंना ओपन चॅलेंज देऊन पाडण्याचे वक्तव्य ऐकून अनेकांना अजित पवार यांची आठवण झाली. अजित पवार यांनीदेखील पुरंदर विधानसभेचे दिवंगत माजी आमदार विजय शिवतारे यांना अशाचप्रकारे निवडणुकीत पाडण्याचे चॅलेंज दिले होते आणि ते खरेही करुन दाखवले होते. "तू 2014 मध्ये जिंकलास, पण 2019 ला तू आमदार कसा होतो तेच बघतो", असे म्हटले होते. अजितदादांचे हे वक्तव्य त्यावेळी प्रचंड गाजले होते. रोहित पवार यांचे वक्तव्य अजितदादांच्या याच वक्तव्याची आठवण करुन देणारे ठरले.
रोहित पवारांच्या या टीकेनंतर विक्रम पाचपुते यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. रोहित पवारांच्या राजकीय अहंकाराचा परिणाम विद्यार्थ्यांवर होऊ देऊ नये. स्वतःचा इगो जपण्यासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरणं योग्य नाही. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न हा राजकीय प्रतिष्ठेचा विषय होऊ नये. आंदोलन विद्यार्थ्यांसाठी आहे की स्वतःचा इगो जपण्यासाठी याचा विचार आता रोहित पवारांनीच करावा, अशी टीका विक्रम पाचपुते यांनी केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.