Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अटक टाळण्यासाठी मागितले दीड लाख, PSI ज्ञानेश्वर पराडे रंगेहात अटक

अटक टाळण्यासाठी मागितले दीड लाख, PSI ज्ञानेश्वर पराडे रंगेहात अटक

मुंबई : खरा पंचनामा 

अटक टाळण्यासाठी लाच मागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. मुंबईतील बोरीवली पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक (PSI) ज्ञानेश्वर पराडे याला १ लाख ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने पोलीस ठाण्यातच रंगेहाथ पकडलं आहे. या घटनेमुळे मुंबई पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका ६५ वर्षीय तक्रारदाराने २९ सप्टेंबर रोजी मुंबई एसीबीकडे (ACB) लाचेबाबत लेखी तक्रार नोंदवली होती. तक्रारदार आणि त्यांच्या दोन बहिणींविरोधात दाखल गुन्ह्यात त्यांना अटक न करण्यासाठी पीएसआय ज्ञानेश्वर पराडे याने सुरुवातीला १ लाख ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर झालेल्या तडजोडीअंती १ लाख ३० हजार रुपये देण्याचं ठरलं.

तक्रारदाराच्या अर्जावरून एसीबीने ३० सप्टेंबर रोजी लाचेच्या मागणीची पंचांसमक्ष पडताळणी केली. लाचेची मागणी सिद्ध झाल्यानंतर एसीबीने तत्काळ सापळा रचण्याची योजना आखली. त्यानुसार ५ ऑक्टोबर रोजी बोरीवली पोलीस ठाण्यातच तक्रारदाराकडून १ लाख ३० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना पीएसआय पराडे याला एसीबीच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतलं.

कारवाईदरम्यान आरोपी अधिकाऱ्याचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून त्याच्या राहत्या घराचीही झडती घेण्यात आली आहे. याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ मधील कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास मुंबई एसीबीचे पथक करत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.