पुणे शिक्षक मतदारसंघामुळे महायुतीत वादाची ठिणगी; भाजपकडून उमेदवारी जाहीर, शिवसेना बंडखोरीच्या तयारीत
पुणे : खरा पंचनामा
केंद्रीय भारत निवडणूक आयोगाने बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या चार राज्यांमध्ये विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुका जाहीर केल्या आहेत.
महाराष्ट्रात 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांसाठी 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार आहे, तर 27 ऑक्टोबर 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. 22 सप्टेंबर 2026 निवडणूक आयोगाकडून या निवडणुकीची कार्यक्रम पत्रिका जाहीर होताच सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. परंतु, या निवडणुकीवरून आता महायुतीत वादाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, पुणे शिक्षक मतदारसंघावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवेसनेने दावा केलेला असतानाच दुसरीकडे ही जागा आता भाजपच्या वाटेला गेली आहे. ज्यामुळे आता शिंदेंची शिवसेना या मतदारसंघात बंडखोरीच्या तयारीत आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघावर महायुतीतील पक्षांनी दावा केला. शिंदेंच्या शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंगेश चिवटे यांचे नाव गेल्या काही दिवसांपासून पुढे होते. अनेकांनी तर ही उमेदवारी त्यांनाच मिळणार असे सांगितले सुद्धा होते. परंतु, आता वरिष्ठ पातळीवरील दीर्घ चर्चेनंतर पुणे शिक्षक मतदारसंघ अखेर भाजपच्याच वाट्याला देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे. पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा भाजपला मिळताच पक्षांतर्गत हालचालींना प्रचंड वेग आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेऊन तिन्ही मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावाची यादी सुपूर्द केली आहे. त्यामुळे आता भाजपकडून कौस्तुभ गावडे यांची केवळ अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.
मात्र, पुणे शिक्षक मतदारसंघावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांतील अनेक स्थानिक इच्छुकांनी दावा ठोकला होता. आता ही जागा भाजपच्या खात्यात गेल्यामुळे मित्रपक्षांतील इच्छुकांमध्ये काही प्रमाणात नाराजी पाहायला मिळत आहे. मात्र, महायुतीचा धर्म पाळत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराज इच्छुकांची वरिष्ठांकडून समजूत काढली जाईल, असे भाजप नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तर, पुण्याची शिक्षक मतदारसंघाची जागा भाजपाच्या वाट्याला गेली असली तरी मंगेश चिवटे हे आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सांगितले जातेय. मंगळवारी, 6 ऑक्टोबरला म्हणजेच उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मंगेश चिवटे यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता नेमकं काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.