Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राहुल गांधी, प्रियंका गांधींविरोधात ३ FIR दाखल; दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांशी झटापट; सलग दुसऱ्या दिवशी ताब्यात

राहुल गांधी, प्रियंका गांधींविरोधात ३ FIR दाखल; दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांशी झटापट; सलग दुसऱ्या दिवशी ताब्यात 

दिल्ली : खरा पंचनामा 

दिल्लीतील 'इंडिया' आघाडीच्या खासदारांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांशी कथित धक्काबुक्की केल्याप्रकरणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी-वाड्रा यांच्याविरोधात किमान तीन 'एफआयआर' दाखल करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिली.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या 'एफआयआर'मध्ये पोलिसांच्या कामात अडथळा आणणे आणि पोलिस अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याशी संबंधित कलमांचा समावेश आहे. याविषयीचे सविस्तर वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.

सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि मतदार याद्यांच्या फेरतपासणीविरोधात विरोधी पक्षाच्या खासदारांनी बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी आक्रमक आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि इतर वरिष्ठ नेत्यांना पुन्हा एकदा ताब्यात घेतले.

प्रियांका गांधींचा रस्त्यावर ठिय्या

दुपारच्या भोजन सत्रानंतर सर्व खासदार कनॉट प्लेस येथील सागर रत्ना रेस्टॉरंटमधून बसने थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे निघाले होते. मात्र, विंडसर पॅलेसजवळ सुरक्षा दल आणि पोलिसांनी त्यांची बस अडवली. त्यानंतर राहुल गांधींसह सर्व खासदार बसमधून खाली उतरले आणि त्यांनी रस्त्यावरच ठिय्या देत जोरदार निदर्शने सुरू केली. यावेळी प्रियांका गांधी हातात संविधानाची प्रत घेऊन रस्त्यावरच बसल्या होत्या आणि त्यांच्याभोवती काँग्रेसचे खासदार व कार्यकर्ते गोळा झाले होते. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला असता, राहुल गांधींनी पोलिसांना रोखत, 'ही माझी बहीण आहे,' असे म्हणत विरोध दर्शवला.

यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये मोठी झटापट झाली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही व्हिडीओंमध्ये, प्रियांका गांधी एका महिला पोलिस अधिकाऱ्याला कोपराने ढकलत असल्याचे दिसत आहे; तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये एका आंदोलकाने पोलिस कर्मचाऱ्याला मागून लाथ मारल्याचा दावा केला जात आहे. या धक्काबुक्कीमध्ये कॉन्स्टेबल अंकित कसाना यांना दुखापत झाली. 'मी माझे कर्तव्य बजावत होतो, यात माझी काय चूक?' असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

तसेच, या कारवाईदरम्यान तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या चेहऱ्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले. या झटापटीत त्या रक्तबंबाळ झाल्याचेही पाहायला मिळाले.

काँग्रेसची देशव्यापी आंदोलनाची घोषणा

पोलिसांनी नंतर राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह सर्व प्रमुख विरोधी नेत्यांना ताब्यात घेतले आणि पोलीस बसमधून नेले. दरम्यान, या पोलिस कारवाईचा निषेध म्हणून काँग्रेसने आज (गुरुवारी) देश पातळीवर राज्य, जिल्हा व ब्लॉक स्तरावर तीव्र आंदोलने करण्याची घोषणा केली आहे. या प्रकरणामुळे केंद्र सरकार आणि विरोधकांमधील संघर्ष आणखी टोकाला जाण्याची चिन्हे आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.