सुप्रीम कोर्ट, हायकोर्टात न्यायमूर्तीच्या नियुक्तीत पक्षपात ! '4 पैकी 3 न्यायाधीश हे...', राष्ट्रपतींना माजी सरन्यायाधिशांचं खळबळजनक पत्र
नवी दिल्ली : खरा पंचनामा
भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई अर्थात बी. आर. गवई यांनी देशातील सर्वोच्च पदावर असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्राची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
न्यायपालिकेतील उच्च संस्थांमध्ये म्हणजेच सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीशांच्या नियुक्त्या आणि बदल्यांमध्ये सामाजिक प्रतिनिधित्व, विविधता आणि गुणवत्तेकडे दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल चिंता माजी न्यायमूर्ती गवई यांनी या पत्राद्वारे व्यक्त केली आहे. गवई यांनी आज म्हणजेच 27 नोव्हेंबर रोजी लिहिलेल्या या पत्राची एक प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एक प्रत केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनाही पाठवली आहे.
माजी न्यायमूर्ती गवई यांनी पत्रात, "सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमच्या (Collegium) अलीकडील शिफारशींवरून असे दिसून येते की केवळ एकाच विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी आणि झुकते माप देण्यासाठी नियुक्त्या केल्या जात आहेत," असं स्पष्टपणे नमूद केले आहे. "देशाच्या एकूण लोकसंख्येत ज्या समाजाचा वाटा 5 टक्क्यांपेक्षाही कमी आहे, त्या समाजाला अलीकडच्या काळात सर्वोच्च न्यायालयात 40 टक्क्यांहून अधिक प्रतिनिधित्व मिळाले आहे, असेही न्यायमूर्ती गवई यांनी पत्रात नमूद केलं आहे. "या अशा नियुक्त्यांमुळे अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागासवर्गीय (ओबीसी), अल्पसंख्याक आणि महिलांना न्यायपालिकेत पुरेसे प्रतिनिधित्व मिळत नाही," असं त्यांनी पत्राच्या माध्यमातून राष्ट्रपतींच्या निदर्शनास आणून दिले आहे.
आपल्या दाव्याचं समर्थन करताना न्यायमूर्ती गवई यांनी केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी मार्च 2025 मध्ये राज्यसभेत दिलेल्या आकडेवारीचा संदर्भ दिला आहे. उच्च न्यायालयांमध्ये नियुक्त झालेल्या एकूण 715 न्यायाधीशांपैकी केवळ 22 जण अनुसूचित जाती (एससी), 16 अनुसूचित जमाती (एसटी), 89 इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि 37 अल्पसंख्याक समाजातील आहेत. म्हणजेच दर चार न्यायाधीशांमागे सुमारे तीन न्यायाधीश हे खुल्या प्रवर्गातील आहेत, असं माजी न्यायमूर्ती गवई यांनी अधोरेखित केलं आहे
जानेवारी 2021 ते जानेवारी 2026 दरम्यान झालेल्या नियुक्त्यांमध्ये सवर्ण अथवा प्रगत समाजाचा वाटा जवळपास 80 टक्के इतका आहे. याउलट, देशात 40 ते 50 टक्के लोकसंख्या असलेल्या ओबीसी समाजाला 14 टक्क्यांपेक्षाही कमी प्रतिनिधित्व मिळालं, असल्याचं पत्रात नमूद केलं आहे. तसेच, प्राध्यापक जॉर्ज गॅडबॉइस यांच्या अभ्यासाचा संदर्भ देत माजी न्यायमूर्ती गवई यांनी 1950 ते 1989 या काळातही एकाच लहान समूहाकडे सर्वोच्च न्यायालयातील एक तृतीयांश पदे कशी होती, याकडे लक्ष वेधले आहे.
कॉलेजियमच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना माजी न्यायमूर्ती गवई यांनी एका प्रकरणाचा आवर्जून उल्लेख केला आहे. एका न्यायाधीशाची त्यांच्या मूळ उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयात शिक्षात्मक कारवाई (प्युनिटिव्ह कन्सिडरेशन) म्हणून बदली करण्यात आली होती. नंतर त्याच न्यायाधीशांना बक्षीस म्हणून एका मोठ्या आणि महत्त्वाच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश (चीफ जस्टीस) म्हणून नियुक्त करण्यात आले, असे गवई यांनी पत्रात नमूद केले आहे. विविधता, समावेशकता आणि गुणवत्ता या तत्त्वांना पूर्णपणे बगल देऊन इतर असंबध गोष्टींचा विचार करून नियुक्त्या व बदल्या होत असल्याबद्दल गवई यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
संविधानाच्या कलम 124 (2) नुसार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा अधिकार राष्ट्रपतींकडे आहे. मात्र, गेल्या काही दशकांत निर्माण झालेल्या प्रथेमुळे कॉलेजियमच्या शिफारशी निर्णायक ठरल्या असल्याचं गवई यांनी पत्रात नमूद केले आहे. ही व्यवस्था कॉलेजियमला जबाबदार धरत नाही आणि राष्ट्रपतींना त्यांच्या संवैधानिक जबाबदारीतून मुक्तही करत नाही, असे गवई यांनी म्हटले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.