Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पराभवानंतर ट्रम्प यांचा भारताला धक्का; 9 कंपन्यावर घातली बंदी; व्यावसायिक दाम्पत्य टार्गेटवर

पराभवानंतर ट्रम्प यांचा भारताला धक्का; 9 कंपन्यावर घातली बंदी; व्यावसायिक दाम्पत्य टार्गेटवर

दिल्ली : खरा पंचनामा 

अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला मोठा धक्का बसला आहे. निकालानंतर वातावरण तापलं असतानाच ट्रम्प प्रशासनाने भारतातील एका व्यावसायिक दाम्पत्यासह नऊ कंपन्यांवर निर्बंध घातले आहेत.

इराणच्या प्रतिबंधित तेल व्यापाराला मदत केल्याचा आरोप या दाम्पत्यावर आहे. समुद्रमार्गे होणाऱ्या तेल वाहतुकीत बनावट नोंदणी आणि प्रमाणपत्रांचा वापर करून आंतरराष्ट्रीय निर्बंधातून पळवाट काढण्यास मदत केल्याचा दावा अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाने केला आहे.

अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाने भारतीय व्यावसायिक सुनील कुमार शर्मा आणि त्यांची पत्नी जसप्रीत प्रीती शाहिद यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. बनावट नोंदणी असलेल्या कंपन्यांचे नेटवर्क दाम्पत्याकडून चालवले जात होते. दोघेही चंदिगडमधून काम करत असल्याची माहिती मंत्रालयाने दिली. जहाजांसाठी बनावट समुद्री नोंदणी आणि झेंड्याशी संबंधित प्रमाणपत्रे तयार करून इराणचे तेल वाहून नेणाऱ्या जहाजांना मदत केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या कारवाईचा समावेश ट्रम्प प्रशासनाच्या ऑपरेशन इकॉनॉमिक आउटकास्टमध्ये करण्यात आला आहे. इराणच्या तेल विक्रीतून मिळणारे उत्पन्न रोखण्यासाठी ट्रम्प यांनी ही मोहिम उघडलीय.

अमेरिकेने केलेल्या दाव्यानुसार, बनावट कंपन्यांच्या या नेटवर्कची सुरुवात २०१४ मध्ये झाली. त्यावेळी या दाम्पत्याने कॅरिबियन देश डोमिनिकाच्या एका प्राधिकरणाच्या नावाने काम करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर वेगवेगळ्या देशांच्या नावाने वेबसाइट तयार करून जहाजांची नोंदणी, समुद्री झेंडा, नाविकांचे प्रशिक्षण आणि जहाजांचे वर्गीकरण अशा सेवा दिल्या जात असल्याचा आरोप आहे. मात्र, संबंधित देशांनी या सेवांना परवानगी दिली नव्हती.

२०२३ मध्ये सुनील शर्मा यांनी सिंगापूरमध्ये 'एस्वातिनी मॅरीटाइम अफेयर्स अँड इंटरनॅशनल शिप रजिस्ट्री' नावाची कंपनी स्थापन केली. एस्वातिनीच्या अधिकाऱ्यांनी या संस्थेशी संबंध नसल्याचे जाहीर केले होते. तरीही ही संस्था इराणी तेल वाहून नेणाऱ्या जहाजांना नोंदणी सेवा देत असल्याचा अमेरिकेचा आरोप आहे.

या कारवाईत ओशनिक टेक्नॉलॉजीज इंडिया, आर्यावर्त शिप मॅनेजमेंट, प्रिसेप्ट ट्रेंड्स, पॉलीनेशिया मॅरीटाइम, एलेक्सार्या फिनसर्व, एलेक्सार्या मीडिया अँड एंटरटेनमेंट, विहाराबोटिंग आणि आर्यावर्त मॅरीटाइम अँड एज्युकेशनल ट्रस्ट यांच्यासह भारतातील नऊ कंपन्या व संस्थांचा समावेश आहे. अश्वनी कुमार धीमान आणि इश्विंदर सिंह यांची नावेही या प्रकरणात घेण्यात आली आहेत.

अमेरिकेचे वित्तमंत्री स्कॉट बेसेंट यांनी इराणला मदत करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांवर पुढेही कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. दरम्यान, अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाने संसदेच्या दोन्ही सभागृहांवर नियंत्रण मिळवले. ट्रम्प यांनी इराण युद्धामुळे वाढलेल्या इंधन दरांचा निवडणुकीवर परिणाम झाल्याचेही मान्य केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.