पिस्टल विक्री आणि फायरींग प्रकरणातील फरार सराईत आरोपी अखेर गजाआड
सांगली ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिस्टल विक्रीदरम्यान झालेल्या फायरींग प्रकरणातील बऱ्याच दिवसांपासून परागंदा असलेला सराईत आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. इनामधामणी येथील विठ्ठल पाटील कॉलेजसमोर रत्नागिरी-नागपूर हायवेवर देशी बनावटीचे पिस्टल विक्री करताना झालेल्या फायरींगमध्ये अदित्यकुमार अशोक नाईक हा तरूण गंभीर जखमी झाला होता. या गुन्ह्यामध्ये फरार असलेला वैभव राजाराम आवळे (वय २७, रा. हडको कॉलनी, मिरज) या संशयित आरोपीला सांगली रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून सांगली ग्रामीण पोलिसांनी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अटक केली आहे.
पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत आणि सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने ही धडक कारवाई पार पाडली. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अरुण औताडे, सहायक पोलीस फौजदार मेघराज रुपनर, पोलीस हेडकॉस्टेबल बंडू पवार आणि अभिजीत पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही यशस्वी कारवाई केली. अटक करण्यात आलेला आरोपी वैभव आवळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विश्रामबाग, मिरज शहर, महात्मा गांधी चौक, कुपवाड एमआयडीसी आणि इतर पोलीस ठाण्यांमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, पिस्टल विक्री व दरोड्यासारखे गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी शिंदे करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.