नेपाळमध्ये दोन हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळली, भारतीय नागरिकाचा करुण अंत, हेलिपॅडवर उतरताना रोटर ब्लेड्स आदळल्या
काठमांडू/दिल्ली : खरा पंचनामा
नेपाळमध्ये दोन हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळून भीषण दुर्घटना घडली. या अपघातात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला, तर न्यूझीलंडची रहिवासी असलेली भारतीय वंशाची एक व्यक्ती जखमी झाली आहे. नेपाळमधील सोलुखुम्बु जिल्ह्यात, काठमांडूपासून सुमारे २५० किमी अंतरावर, मंगळवारी सकाळी ही घटना घडली.
वसंत कुमार बलारा माडू असे ४७ वर्षीय मृत भारतीय व्यक्तीचे नाव आहे. तर जखमी व्यक्ती ५३ वर्षीय शैलेश किशन पटेल असून, ते भारतीय वंशाचे न्यूझीलंडचे नागरिक आहेत.
नेपाळच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, फेरिचे हेलिपॅडवर उतरण्याचा प्रयत्न करत असताना दोन्ही हेलिकॉप्टरच्या रोटर ब्लेड्स एकमेकांवर आदळल्या. या घटनेत 'फिशटेल एअर' आणि 'डायनेस्टी एअर' या कंपन्यांची हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाली.
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, यामध्ये हेलिकॉप्टर अत्यंत जवळ आल्यानंतर त्यांच्या रोटर ब्लेड्सची धडक झाल्याचे दिसून येते.
सोलुखुम्बु जिल्हा पोलीस कार्यालयाचे डीएसपी नबिनराज बुढाथोकी यांनी सांगितले की, 'खुम्बु पासांग ल्हामु फेरिचे' हेलिपॅडवर दोन्ही हेलिकॉप्टर उतरत असताना हा अपघात घडला.
पोलिसांनी सांगितले की, "मृत व्यक्ती परदेशी नागरिक आहे, परंतु त्यांची अधिकृत ओळख आणि राष्ट्रीयत्व अद्याप निश्चित झालेले नाही. मृतदेह नंतर हेलिकॉप्टरद्वारे लुक्ला येथे नेण्यात आला." अपघातात जखमी झालेल्या दुसऱ्या व्यक्तीला उपचारांसाठी दुसऱ्या हेलिकॉप्टरद्वारे हलवण्यात आले.
नागरी उड्डाण प्राधिकरणाचे माहिती अधिकारी ज्ञानेंद्र भुल यांनी या अपघाताला दुजोरा दिला असून, अधिकारी या घटनेबाबत अधिक माहिती गोळा करत असल्याचे सांगितले. अपघाताच्या नेमक्या परिस्थितीबाबत अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.