शेळी-बोकड चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद
मिरज ग्रामीण पोलिसांची कारवाई
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
मिरज ग्रामीण पोलीस
ठाण्याच्या पथकाने शेळ्या व बोकड चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून एकूण २ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. शिवानंद नागाप्पा सनदी (वय २३ वर्षे) आणि राजू चिक्क्या सनदी (वय ३२ वर्षे, दोघेही रा. कंचकरवाडी, ता. रायबाग, जि. बेळगाव, राज्य कर्नाटक) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेळ्या व बोकडांच्या चोरीच्या घटना वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील यांच्या सूचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सापळा रचून या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी आरग येथील नरवाड रोडवरील शेडमधून शेळी चोरल्यासह मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यातील गु.र.नं. ६३३/२०२६, १८७/२०२६, २८७/२०२६, ५२६/२०२६ आणि ६१०/२०२६ या एकूण पाच गुन्ह्यांची कबुली दिली. तसेच गुंडेवाडी, व्यकोचीवाडी, सांबरवाडी, बेडग आणि आरग परिसरातूनही शेळ्या व बोकड चोरल्याचे त्यांनी मान्य केले आहे.
पोलिसांनी आरोपींकडून चोरीची बोकडे व शेळ्या विकून शिल्लक राहिलेली १ लाख १० हजार रुपये किमतीची ५०० रुपयांच्या चलनी नोटांची रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली १ लाख २० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल (क्र. KA 23 HD 1475), असा एकूण २ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजित कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील, सपोनि विक्रांत संकपाळ, सपोउपनि प्रविण यादव, पोहेकॉ सचिन हाक्के, राजेंद्र बाबर, भारत पवार, मनोज जाधव तसेच पोलीस कॉन्स्टेबल वसंत कांबळे आणि धनचंद्र मोरे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.