खुनाच्या गुन्ह्यातील जामिनावरील आरोपीचा जामीन रद्द; पुन्हा कारागृहात रवानगी
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत नोंद असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर असलेल्या आरोपीचा जामीन न्यायालयाने रद्द केला असून, त्याला पुन्हा कारागृहात पाठवण्यात आले आहे. अतुल पोपट ऊर्फ दादासो वायदंडे (वय २८, रा. खंडेराजुरी, ता. मिरज, जि. सांगली) असे या आरोपीचे नाव आहे.
मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल गु.र.नं. २९१/२०२६ (भा.द.वि.स. कलम ३०२, ३२४, ३२३, १४३, १४७, १४८ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१), ३७(३), १३५) मधील खुनाच्या गुन्ह्यात न्यायालयाने अटी व शर्तींवर त्याला जामीन मंजूर केला होता. मात्र, जामिनावर मुक्त असताना त्याने संजयनगर पोलीस ठाण्याच्या गु.र.नं. २३५/२०२६ (बीएनएस कलम १०३(२)) मधील वेदांत बंडगर (रा. संजयनगर) या बालकाच्या खुनाच्या गुन्ह्यात सहभाग घेतल्याचे निष्पन्न झाले होते आणि त्यातही तो जामिनावर बाहेर आला होता.
मिरज ग्रामीण पोलिसांच्या गुन्ह्यात जामिनावर सुटल्यानंतरही त्याच्या वागणुकीत कोणतीही सुधारणा न होता गुन्हे करण्याचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले. या पार्श्वभूमीवर जामिनाच्या अटींचा भंग व वर्तणुकीचा सविस्तर अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला. त्यानुसार न्यायालयाने त्याचा जामीन तात्काळ रद्द करून त्याला कारागृहात रवाना करण्याचे आदेश दिले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे आणि जिल्हा सरकारी अभियोक्ता प्रमोद भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील, कोर्ट पैरवी सपोउपनि शामकुमार साळुंखे, रावसाहेब सुतार व पोकाँ राजगे यांनी पार पाडली. दरम्यान, यापुढे जामिनावर बाहेर असलेल्या आरोपींच्या वर्तनात किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीत सुधारणा न झाल्यास त्यांचे जामीन अर्ज रद्द करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.