पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
६९ लाखांच्या अवैध गोव्याच्या मद्यासह चार जण अटकेत
पूजा फडके
पुणे : खरा पंचनामा
पुणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 'डी' विभागाने गोवा राज्यातून बेकायदेशीरपणे विनापरवाना आणलेल्या तब्बल ६९ लाख २६ हजार ३९० रुपयांच्या विदेशी मद्यासह चार जणांना जेरबंद केले आहे.
राज्य उत्पादन शुल्क, 'डी' विभाग, पुणे या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, ३० ऑक्टोबर २०२६ रोजी माणिकबाग (ब्रह्मा हॉटेल समोर) आणि पर्वती दर्शन परिसरात अचानक छापे टाकण्यात आले. या कारवाईत अमोल सुरेश निकम आणि योगेश रामदास नाईक या दोन आरोपींकडून गोवा राज्य निर्मित विविध ब्रँडचा मद्यसाठा व वाहने जप्त करण्यात आली, ज्यानंतर न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
या आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, ३ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे स्वारगेट येथील हॉटेल आश्रय समोर आणखी एक छापा टाकण्यात आला. यामध्ये एका इंटरसिटी ट्रॅव्हल बसमधून अवैध मद्य जप्त करून रवि शिवाप्पा माने आणि करण ज्ञानोबा गायकवाड या दोघांना अटक करण्यात आली, ज्यांना न्यायालयाने १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या संपूर्ण धडक कारवाईत एकूण ११२ बल्क लिटर विदेशी मद्य, २ मोटरसायकल, १ चारचाकी वाहन आणि १ सहाचाकी ट्रॅव्हल बस असा एकूण ६९,२६,३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा, १९४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास दुय्यम निरीक्षक जी. पी. थोरात करत आहेत.
प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, परराज्यातील असे अवैध मद्य खरेदी न करता केवळ अधिकृत मद्यविक्री करणाऱ्या दुकानातूनच मद्य खरेदी करावे आणि याबाबत काही माहिती असल्यास ०२०-२६१२७३२१ या क्रमांकावर संपर्क साधावा.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
