पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
सांगली जिल्ह्यातील पलूस येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एका जुगार अड्ड्यावर छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. पलूसमधील जुना सातारा रोडवरील उर्दू शाळेजवळ असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीरपणे तीन पानांचा जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दिनांक ७ नोव्हेंबर २०२६ रोजी या ठिकाणी अचानक छापा टाकला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या १२ जणांना रंगेहात ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एकूण ४ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून रोख ४७ हजार रुपये, १ लाख ४९ हजार रुपये किमतीचे १२ मोबाईल फोन आणि जुगारासाठी वापरलेली चार वेगवेगळ्या कंपन्यांची मोटारसायकल वाहने असा एकूण ४,३६,००० रुपयांचा मुद्देमाल पंचनाम्याद्वारे जप्त केला आहे. या प्रकरणी पलूस पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियम १८८७ चे कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पलूस पोलीस करत आहेत.
सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, अमित परीट व त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
