मुंबई : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर शिवसेना (शिंदे गट) नेते रामदास कदम यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. "सुनील तटकरे हे कोणाचेही होऊ शकत नाहीत, ते बेईमान माणूस आहेत," अशी टीका करत रामदास कदम यांनी अजित पवारांच्या कथित घातपातामध्ये सुनील तटकरे यांचा हात आहे का, याची सखोल चौकशी करण्याची थेट मागणी केली आहे.
कदम यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
सुनील तटकरे यांच्याशी असलेल्या जुन्या राजकीय संबंधांचा उल्लेख करताना रामदास कदम म्हणाले, "भूतकाळात तटकरे यांच्या निवडणुकीत आम्ही खांद्याला खांदा लावून काम केले होते. मात्र, त्यावेळी अनेकांनी मला तटकरे कोणाचेही होणार नाहीत, ते बेईमान आहेत आणि भविष्यात मदत करणार नाहीत, असा इशारा दिला होता. दुर्दैवाने त्यावेळी मी या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले."
विधानसभा निवडणुकीत योगेश कदम यांच्या विरोधात तटकरे यांनी काम केल्याचा आरोपही कदम यांनी केला. "महायुतीमध्ये राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना एकत्र असतानाही गुहागर मतदारसंघात तटकरे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आणि भास्कर जाधवांना छुपी मदत केली," असा दावा त्यांनी केला.
कोकणातील धरणांच्या मुद्द्यावरूनही रामदास कदम यांनी तटकरेंवर निशाणा साधला.
"कोकणातील १६ धरणांबाबत सुमारे ७० हजार कोटी रुपयांच्या आरोपांचा संदर्भ देत त्यांनी पोयनाळ धरणाचा मुद्दा उपस्थित केला. अनेक वर्षे या धरणाचे काम रखडल्यामुळे १४ गावांतील नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागले आणि याला संपूर्णपणे तटकरेच जबाबदार आहेत," असा आरोप त्यांनी केला.
सुनील तटकरे यांना स्वतःला उपमुख्यमंत्री व्हायचे होते, असा टोला लगावत कदम म्हणाले, "हा माणूस अत्यंत महत्त्वाकांक्षी असून राजकीय स्वार्थासाठी काहीही करू शकतो."
तसेच तटकरेंना उद्देशून आक्रमक भाषेत सुनावताना ते म्हणाले, "माझ्या शेजारी बसण्याची तुझी औकात तरी आहे का?"
रामदास कदम यांच्या या वक्तव्यातील सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे त्यांनी अजित पवारांच्या कथित घातपाताबाबत व्यक्त केलेला संशय होय. "अजितदादांच्या घातपातामध्ये सुनील तटकरे यांचा काही हात आहे का? या अँगलनेही तटकरेंची कसून चौकशी झाली पाहिजे," अशी मागणी कदम यांनी केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
