Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

फडणवीस सरकारचा निर्णय, २४ तासांत राहुल गांधीची एन्ट्री; गोकुळच्या राजकारणात मोठी घडामोड

फडणवीस सरकारचा निर्णय, २४ तासांत राहुल गांधीची एन्ट्री; गोकुळच्या राजकारणात मोठी घडामोड 



कोल्हापूर : खरा पंचनामा 

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात 'गोकुळ' दूध संघातील सत्तासंघर्ष आता थेट दिल्लीच्या राजकीय वर्तुळात पोहोचला आहे. गोकुळमध्ये महायुतीचा पराभव झाल्यानंतरही राज्य सरकारने मागच्या दाराने शासन नियुक्त संचालक नियुक्त करून बहुमतावर ताबा मिळवल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर थेट आणि सडकून प्रहार केला आहे. 


राहुल गांधी यांनी या प्रकरणी ट्विट करत भाजपवर ताशेरे ओढले आहेत. "गोकुळमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांनी भाजपचा पराभव केला होता. मात्र, पराभव पचवता न आल्याने भाजपने निवडणुकीनंतर नियमच बदलले. जबरदस्तीने ४ अतिरिक्त संचालक घुसवून संचालकांची संख्या १२ वरून १६ केली आणि बहुमतावर ताबा मिळवला," असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. 

पुढे बोलताना ते म्हणाले की, "हा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मतांवर उघडपणे टाकलेला दरोडा आहे आणि जनमताची केलेली भेसळ आहे. सत्तेत टिकून राहण्यासाठी भाजप इतका हताश झाला आहे की ते कोणत्याही थराला जाण्यास तयार आहेत. ज्यांनी दूध उत्पादकांची मते चोरली आहेत, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी-देशातील शेतकरी हा प्रकार कधीही विसरणार नाही!" 

गोकुळमधील या घडामोडींमुळे कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आणि राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला असून आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या झाडल्या जात आहेत. सध्या गोकुळमध्ये काँग्रेस नेते आणि माजी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीकडे काठावरचे बहुमत आहे. सतेज पाटील गटाकडून शशिकांत चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड होणे जवळपास निश्चित मानले जात होते. मात्र, महायुतीच्या १२ संचालकांनी अध्यक्ष निवडीच्या बैठकीकडे पाठ फिरवल्याने अध्यक्षपदाची निवड झाली नाही. त्यानंतर आता थेट राज्य सरकारनेच हस्तक्षेप करत चार शासननियुक्त संचालकांची वर्णी लावण्याचा मार्ग मोकळा केला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.