कोलकाता : खरा पंचनामा
कोलकात्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी (११ नोव्हेंबर) सकाळी खळबळ उडाली. मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील टॉयलेटच्या आरशावर विमान अपहरणाची धमकी देणारा संदेश लिहिल्याचे आढळून आले. हा प्रकार समोर येताच विमानतळावरील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे विमान मुंबईला जाण्यासाठी उड्डाणाच्या तयारीत असताना हा प्रकार उघडकीस आला. विमानातील शौचालयाच्या आरशावर अपहरणासंदर्भातील धमकीचा संदेश लिहिलेला होता. ही बाब लक्षात येताच वैमानिकाने तातडीने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला (एटीसी) याची माहिती दिली.
त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून विमानाला आयसोलेशन बेमध्ये हलविण्यात आले. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांसह विमानतळावरील विशेष सुरक्षा पथकाने विमानाची कसून तपासणी सुरू केली. विमानात कोणतीही संशयास्पद वस्तू आहे का, याची तपासणी करण्यात येत आहे.
दरम्यान, विमानाच्या आरशावर धमकीचा संदेश कोणी लिहिला, याचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणांनी चौकशी सुरू केली आहे. विमानातील प्रवाशांची यादी तपासली जात असून विमानतळ परिसरातील तसेच विमानातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे. संदेश लिहिणाऱ्या व्यक्तीची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरक्षा यंत्रणांकडून केला जात आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून सुरक्षेच्या दृष्टीने सर्व आवश्यक खबरदारी घेतली जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
