Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गोकुळच्या मोर्चात पायताण अन् बॅनरची चर्चा, 'लक्षात ठेवलंय २०२९, हे कोल्हापूर हाय'; महायुतीविरोधात शेतकरी आक्रमक

गोकुळच्या मोर्चात पायताण अन् बॅनरची चर्चा, 'लक्षात ठेवलंय २०२९, हे कोल्हापूर हाय'; महायुतीविरोधात शेतकरी आक्रमक 



कोल्हापूर : खरा पंचनामा 

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीनंतर पाच तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्तीवरून कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीच्या या निर्णयाविरोधात शेतकरी आणि राजकीय कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, कोल्हापुरात आयोजित संघर्ष मोर्चातून ही नाराजी तीव्रपणे समोर आली. 

मोर्चातील विविध बॅनर, घोषवाक्ये आणि प्रतीकात्मक कोल्हापुरी पायताण यामुळे आंदोलनाची चर्चा रंगली. गोकुळच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत २५ पैकी १३ जागा जिंकलेल्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने तज्ज्ञ संचालक नियुक्तीच्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. आघाडीचे प्रमुख आमदार सतेज पाटील यांनी या निर्णयाविरोधात न्यायालयीन आणि रस्त्यावरील लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे संघर्ष मोर्चाचे आयोजन करण्यात आले. 

मोर्चामध्ये सहभागी झालेल्यांनी विविध बॅनरच्या माध्यमातून महायुतीच्या निर्णयावर टीका केली. 'लक्षात ठेवलंय २०२९, हे कोल्हापूर हाय' या घोषवाक्याने विशेष लक्ष वेधले. गोकुळच्या सत्तासमीकरणावरून निर्माण झालेल्या वादाचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीतही दिसू शकतो, असा राजकीय संदेश या बॅनरमधून देण्यात आला. 'गोकुळसाठी एवढा रडीचा डाव खेळणाऱ्यांनी विचार करा, विधानसभेसाठी काय काय केलं असेल?' अशा आशयाच्या टीकेमुळे मोर्चाला राजकीय धार मिळाली. 

समविचारी आघाडीचे १३ संचालक निवडून आल्याचा संदर्भ देत, विरोधकांच्या बॅनरमधून महायुतीच्या निर्णयावर उपरोधिक भाष्य करण्यात आले. मोर्चातील आणखी एक लक्षवेधी बाब म्हणजे प्रतीकात्मकरीत्या आणण्यात आलेले कोल्हापुरी पायताण. गोकुळच्या निर्णयाविरोधातील नाराजी व्यक्त करण्यासाठी या पायताणाचा वापर करण्यात आल्याने आंदोलनातील दृश्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. 'आम्ही हातकणंगलेकर' या बॅनरनेही मोर्चात विशेष चर्चा निर्माण केली. त्याचबरोबर 'ही संघर्षाची शेवटची दिवाळी असू दे, हे कोल्हापूर हाय' या संदेशातून आगामी काळातील राजकीय संघर्षाचा सूर व्यक्त करण्यात आला. 

मोर्चातील एका बॅनरवर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या राजकीय भूमिकेचा संदर्भ देत सध्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करण्यात आला. 'एक खासदार कमी होता म्हणून राजीनामा देणारे अटलजी कुठे आणि एक संचालक कमी आहे म्हणून चार संचालक नियुक्त करणारे कुठे?' असा सवाल या बॅनरमधून करण्यात आला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.