राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चार वेगवेगळे मतप्रवाहः एनडीएमध्ये जाण्याबाबत पक्षात मतभेद, रोहित पाटलांची भूमिका चर्चेत; सुप्रिया सुळे यांच्या निर्णयाकडे लक्ष
मुंबई : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाची चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जोर धरत आहे. मात्र, या प्रक्रियेत केवळ विलिनीकरणाचा मुद्दाच नाही, तर आगामी सत्तासमीकरणांबाबतही पक्षांतर्गत वेगवेगळे मतप्रवाह असल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या गटात विलिनीकरण आणि एनडीएसोबत सत्तेत सहभागी होण्याबाबत चार वेगवेगळ्या भूमिका असल्याचे सांगितले जात आहे.
शरद पवार गटातील काही ज्येष्ठ आमदार दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे एकत्रीकरण करून सत्तेत सहभागी होण्याच्या बाजूने असल्याचे समजते. राजकीय स्थैर्य आणि सत्तेतील सहभागाच्या दृष्टीने हा पर्याय योग्य ठरू शकतो, अशी या गटाची भूमिका असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
यापूर्वी अजित पवार यांच्या उपस्थितीत विलिनीकरणासंदर्भात अनेक बैठका झाल्याची चर्चा होती. आता पुन्हा एकदा या प्रक्रियेला गती मिळाल्याने दोन्ही पक्षांतील नेत्यांच्या हालचाली वाढल्या आहेत.
दुसरीकडे, काही आमदारांचा विलिनीकरणाऐवजी स्वतंत्र गट म्हणून एनडीएमध्ये सहभागी होण्याचा पर्याय असल्याचे सांगितले जात आहे. पक्षाचे एकत्रीकरण न करता सत्तेत सहभागी झाल्यास राजकीय अस्तित्व आणि स्वतंत्र ओळख कायम ठेवता येईल, असा या मतप्रवाहाचा विचार असल्याची चर्चा आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणात विलिनीकरण करायचे की स्वतंत्रपणे सत्तेत सहभागी व्हायचे, हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या चर्चेदरम्यान आमदार रोहित पवार हे सत्तेत सहभागी होण्याच्या प्रस्तावाला विरोध करत असल्याचे वृत्त आहे. तर आमदार रोहित पाटील यांनी विलिनीकरणाबाबत पक्ष जो अंतिम निर्णय घेईल, तो मान्य करण्याची भूमिका घेतल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे दोन्ही युवा आमदारांच्या भूमिकांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी अद्याप या विषयावर अंतिम भूमिका स्पष्ट केलेली नसल्याचे समजते. पक्षातील आमदारांशी यासंदर्भात औपचारिक चर्चा झाल्यानंतर पुढील दिशा निश्चित होण्याची शक्यता आहे.
सुप्रिया सुळे सध्या दिल्लीतील संसदीय समितीच्या बैठकीसाठी उपस्थित असून, शरद पवार मुंबईत आहेत. त्यामुळे आगामी काही दिवसांत राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
