Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नागपूर हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला! डिसेंबरदरम्यान विधानमंडळाचे कामकाज; तारखा जाहीर

नागपूर हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला! डिसेंबरदरम्यान विधानमंडळाचे कामकाज; तारखा जाहीर



मुंबई : खरा पंचनामा 

महाराष्ट्र विधिमंडळाचे यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ७ ते १८ डिसेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्याचे निश्चित झाले आहे. विधानमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाच्या कालावधीबाबत निर्णय घेण्यात आला. त्यामुळे नागपूरमध्ये होणाऱ्या या अधिवेशनासाठी प्रशासकीय आणि राजकीय स्तरावर तयारीला वेग येण्याची शक्यता आहे.

नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन हे केवळ विधिमंडळाचे नियमित कामकाज नसून विदर्भातील जनतेच्या प्रश्नांना राज्याच्या सर्वोच्च लोकशाही व्यासपीठावर मांडण्याची महत्त्वाची संधी मानली जाते. शेतकरी, सिंचन, रोजगार, उद्योग, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण विकास यांसारख्या विषयांवर या अधिवेशनात चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

या अधिवेशनाचे वैशिष्ट्य म्हणजे ७ डिसेंबरपासून कामकाज सुरू होऊन १८ डिसेंबरला संपणार असल्याने प्रत्यक्षात दोन आठवड्यांचा कालावधी मिळणार आहे. संसदीय कार्य विभागाच्या तात्पुरत्या कामकाज दिनदर्शिकेनुसार पहिल्या दिवशी विविध अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणार असून राज्याच्या पुरवणी मागण्या सादर केल्या जाणार आहेत. शेवटच्या दिवशी शासकीय तसेच अशासकीय कामकाज होणार आहे.

मात्र, अधिवेशनाचा कालावधी निश्चित होताच नागपूर कराराचा मुद्दाही पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे. १९५३ च्या नागपूर करारानुसार विदर्भाच्या विकासाला न्याय देण्यासाठी राज्य विधिमंडळाचे एक अधिवेशन नागपूर येथे घेण्याची तरतूद करण्यात आली होती. या कराराचा संदर्भ देत नागपुरातील अधिवेशन सहा आठवड्यांचे असावे, अशी भूमिका अनेकदा मांडली जाते. मात्र, प्रत्यक्षात गेल्या अनेक वर्षांपासून अधिवेशनाचा कालावधी मर्यादित ठेवला जात असल्याने विदर्भातील प्रश्नांना पुरेसा वेळ मिळत नसल्याची टीका होत आहे. यंदाही दोन आठवड्यांच्या कामकाजामुळे हा वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे.

अधिवेशनासाठी नागपुरातील प्रशासकीय यंत्रणाही सज्ज होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने विधानभवन, आमदार निवास, रविभवन, नागभवन आणि अन्य शासकीय इमारतींमधील दुरुस्ती, रंगरंगोटी, विद्युत व्यवस्था, पाणीपुरवठा आणि निवास व्यवस्थेसाठी ३८६ कामे निश्चित केली आहेत. यामध्ये २२९ शासकीय कार्यालयीन इमारती आणि १५७ निवासस्थानांचा समावेश आहे. या कामांसाठी २७ नोव्हेंबरपर्यंतची मुदत ठेवण्यात आली असून सुमारे १५० कामांच्या निविदा प्रक्रियेला विलंब झाल्याचे वृत्त आहे. अधिकारी आणि कर्मचारी २५ नोव्हेंबरपासून नागपुरात दाखल होण्याची अपेक्षा आहे.

या अधिवेशनात विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य मिळणार का, सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी ठोस निर्णय होणार का, बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कोणती पावले उचलणार, तसेच उद्योग आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कोणत्या घोषणा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.