Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शंभरदा फोन केला, पाणी मिळेना, रस्त्यात खड्डे; स्टेजवरच बीडच्या खासदारांना तरुणाचा सवाल, माइक हिसकावल्यानं गोंधळ

शंभरदा फोन केला, पाणी मिळेना, रस्त्यात खड्डे; स्टेजवरच बीडच्या खासदारांना तरुणाचा सवाल, माइक हिसकावल्यानं गोंधळ

बीड : खरा पंचनामा 

बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या गेवराईतील एका कार्यक्रमात तरुणाच्या संतापाला सामोरं जावं लागलं. खासदार सोनवणे भाषणासाठी उभा राहण्याआधी एका तरुणानं त्यांच्या हातातला माईक हिसकावला आणि पाण्याच्या प्रश्नावरून जाब विचारला.

'आम्हाला पाण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या. आम्ही तुम्हाला मतदान केलं आहे. आता आमचा प्रश्न सोडवा,' अशी मागणी या तरुणाने केली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बीडच्या गेवराई तालुक्यातील शिंगरवाडी येथील मंदिर परिसरात लोकलढा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. जायकवाडी प्रकल्पातून गेवराई तालुक्यातील २० गावांसाठी स्वतंत्र कालवा तयार करावा, अशी मागणी केली जात आहे. यासाठी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला खासदार बजरंग सोनवणे उपस्थित होते.

सोनवणे यांचं भाषण सुरू होण्यापूर्वी गावातील मनीष शेळके या तरुणाने अचानक माईक हातात घेतला. बीडमध्ये रेल्वे आणण्याचं श्रेय अनेकजण घेतात. आता तुम्ही पाण्यासाठीही लढा उभारा. मग आम्ही लोकांना सांगू की खासदार बाप्पांनी आम्हाला पाणी आणून दिलं, असं तो म्हणाला.

पाण्याच्या प्रश्नासाठी आपण खासदारांना शंभर वेळा फोन केल्याचा दावाही त्याने केला. तुम्ही आता इथे आला आहात तर आमचा प्रश्न सोडवा, अशी विनंती त्याने केली. यावेळी त्याने गावातील रस्त्यांच्या दुरवस्थेवरही प्रश्न उपस्थित केला. रस्त्यांवर गुडघाभर खड्डे आहेत. आमचे प्रश्न आम्ही मांडायचे तरी कुणाकडे, असा सवाल त्याने केला. गेवराईच्या आमदारांवरही त्याने नाराजी व्यक्त केली. आमदारांना गेवराईचा विसर पडला आहे का? ते गेवराईचे आमदार आहेत की बीडचे, असा प्रश्न त्याने उपस्थित केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.