पालघर : खरा पंचनामा
पालघर जिल्ह्यातून आज मोठी राजकीय घडामोडी समोर आली आहे. बंडावेळी शिवसेना शिंदे गटासोबत राहिलेले माजी आमदार श्रीनिवास वनगा यांनी आज भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. वनगा यांच्या भाजप प्रवेशाने पालघरमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार हेमंत सावरा यांच्या उपस्थितीत वनगा यांनी पक्षप्रवेश केला. शिवसेनेत बंड झाल्यानंतर शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांपैकी एकमेव श्रीनिवास वनगा यांचे मागील विधानसभा निवडणुकीत तिकीट कापण्यात आलं होते.
यानंतर वनगा यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती तसेच यानंतर श्रीनिवास वणगा हे शिवसेनेत फारसे सक्रीय दिसले नाही. तेव्हापासूनच वणगा शिवसेना सोडून लवकरच राजकीय निर्णय घेतील, असे अनेकांना वाटत होते.
गुरूवारी अचानक त्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केल्यामुळे डहाणू आणि पालघर विधानसभेत शिवसेना शिंदे गटाला हा मोठा धक्का मानला जात असून भाजपने पुढच्या विधानसभेसाठी मोठी खेळी केल्याचं बोललं जातंय.
श्रीनिवास वनगा हे पालघर जिल्ह्यातील राजकारणी आहेत. ते २०१९ ते २०२४ या कालावधीत पालघर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. श्रीनिवास वनगा हे भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र आहेत. जानेवारी २०१८ मध्ये वडिलांच्या निधनानंतर त्यांनी राजकारणात सक्रीय सहभाग घेतला.
भाजपने पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी २०१८ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. या पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला. ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी अखंड शिवसेनेकडून पालघर मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार योगेश नम यांचा ४० हजार ३०५ मतांच्या फरकाने पराभव करत एकूण ६८ हजार ४० मते मिळवली. त्यांनी २४ ऑक्टोबर २०१९ ते २३ नोव्हेंबर २०२४ पर्यंत आमदार म्हणून काम पाहिले.
जून २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिला आणि बंडखोर आमदारांसोबत ते सुरत आणि गुवाहाटी येथे गेले होते. ऑक्टोबर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाने पालघर मतदारसंघातून राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली आणि वनगा यांचे तिकीट कापले. या निर्णयामुळे नाराज होऊन ते ३६ तास 'नॉट रिचेबल' झाले होते. २०२४ च्या निवडणुकीत तिकीट नाकारल्यापासून ते शिंदे गटावर नाराज होते. अखेर आज त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
