Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'माझा जन्म परदेशात झाल्याने शरद पवारांनी...', सोनिया गांधींचा गौप्यस्फोट; मोदींबद्दलही मोठा दावा, 'त्यांना पंतप्रधान करण्यासाठी RSS ने...'

'माझा जन्म परदेशात झाल्याने शरद पवारांनी...', सोनिया गांधींचा गौप्यस्फोट; मोदींबद्दलही मोठा दावा, 'त्यांना पंतप्रधान करण्यासाठी RSS ने...' 



दिल्ली : खरा पंचनामा 

काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे बहुचर्चित आत्मचरित्र 'बिलॉगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह' आज प्रकाशित होत आहे. या पुस्तकामधून सोनिया गांधींनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. पुस्तकामध्ये एके ठिकाणी सोनिया गांधींनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपूर्वीच्या कहाणीसंदर्भात खुलासा केला आहे. 

1999 मधील काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षासंदर्भातील हा खुलासा असून यामध्ये राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी कशाप्रकारे सोनिया गांधींना परदेशात जन्मल्याने विरोध केलेला याबद्दल सांगितलं आहे. शरद पवारांनी सोनिया गांधींच्या परदेशी जन्माचा मुद्दा उपस्थित केल्याचं सोनिया गांधींच्या आत्मचरित्रात म्हटलं आहे. काँग्रेसच्या तत्कालीन कार्यकारिणीतील तीन नेत्यांनी मे 1999 मध्ये सोनिया गांधींना पत्र लिहिले होते. या पत्रात परदेशात जन्म झाल्यामुळे त्यांना भारतातील सर्वोच्च पद भूषवता येणार नाही, अशी भूमिका मांडण्यात आली होती. या तीन नेत्यांमध्ये शरद पवार प्रमुख होते, असा उल्लेख सोनिया गांधींनी आपल्या 'बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह' या पुस्तकात केला आहे. 

या घटनेनंतर सोनिया गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. या निर्णयामुळे काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली. देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी केली आणि राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. सोनिया गांधींनी राजीनाम्याच्या पत्रात, परदेशात जन्म झाला असला तरी भारत माझी मातृभूमी आहे आणि अखेरच्या श्वासापर्यंत मी भारतीयच राहीन, अशी भूमिका मांडली होती. कार्यकर्त्यांचा दबाव आणि काँग्रेस कार्यकारिणीच्या आग्रहानंतर सोनिया गांधींनी राजीनामा मागे घेतला. त्यानंतर काँग्रेसने विशेष अधिवेशनात शरद पवार, पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर या तिन्ही नेत्यांवर कारवाई केली. 

पुढे शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली, असा उल्लेख पुस्तकात आहे. सोनिया गांधींनी पुढे महाराष्ट्रात राष्ट्रवादीसोबत काँग्रेसने आघाडी केल्याचंही सांगितलं. "महाराष्ट्र विधानसभा निवडणुका आम्ही वेगवेगळ्या लढलो, मात्र नंतर आघाडी केली. त्यावेळी ती एखादी कडू गोळी गिळण्यासारखी गोष्ट होती, मात्र आम्ही आघाडी सरकार स्थापन करू शकलो आणि तेव्हापासून आमची आघाडी कायम आहे," असं सोनिया गांधींनी म्हटलं आहे. 

सोनिया गांधींनी आपल्या आत्मचरित्रामध्ये अण्णा हजारेंचं आंदोलन भाजप- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पुरस्कृत केलेलं होतं, असंही म्हटलं आहे. मोदींना पंतप्रधान करण्यासाठी 'आरएसएस'ने 2012 पासूनच आखली होती रणनीती, असा दावा सोनिया गांधींनी आपल्यात पुस्तकात केला आहे. अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला भाजप आणि 'आरएसएस'चा पाठिंबा असल्याचेही सोनिया गांधींनी म्हटलं आहे. आंदोलनासाठी भाजप-'आरएसएस 'कडून नियोजन आणि संघटन केल्याचा उल्लेख पुस्तकात आहे. तसेच, अण्णा आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेस सरकारला घेरण्यात आल्याचे निरीक्षण सोनिया गांधींनी पुस्तकात नोंदवले आहे. 

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 'आरएसएस'ने नरेंद्र मोदींच्या राष्ट्रीय नेतृत्वासाठी बेस तयार केल्याचा दावा सोनिया गांधींनी केला आहे. मोदींच्या प्रचारासाठी हजारो तरुणांची सोशल मीडिया टीम कामाला लावल्याचा उल्लेखही पुस्तकात करण्यात आलाय. देशभर होर्डिंग्ज, सोशल मीडिया आणि होलोग्राम तंत्रज्ञानाद्वारे मोदींची प्रतिमा उभी केल्याचे पुस्तकात नमूद केलं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.