'आम्ही आधीच सांगितलं होतं.. 'गोकुळ अध्यक्ष निवड सुरू असताना सीएम फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई : खरा पंचनामा
'गोकुळ' (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ) दूध संघाच्या अध्यक्षपदाची अत्यंत चुरशीची निवडणूक एका बाजूला सुरू असताना, दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकारांसोबत केलेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये या संपूर्ण वादावर आणि राजकीय घडामोडींवर स्पष्ट भाष्य केले आहे. "गोकुळसंदर्भात मी कायदा आणि संस्थेच्या पाठीमागे उभा आहे," असे स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले आहे.
पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक संवादादरम्यान बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "गोकुळसंदर्भात मी आधीही सांगितले होते की, तिथे एक प्रकारे वैधानिक पेच निर्माण झाला होता. एका गटाकडे १३ तर दुसऱ्या गटाकडे १२ जागा होत्या. यामुळे कोरम (गणपूर्ती) पूर्ण होत नव्हता आणि कोणाच्याही एकाच्या भरोश्यावर अध्यक्ष होऊ शकत नव्हता. सरकारला जर आधीच वाटले असते, तर निवडणुकीनंतर लगेचच संचालक टाकले असते. डीडीआर सुद्धा असतो, मात्र कोरमसाठी बहुमत नाही हे लक्षात आल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
या प्रकरणावर उच्च न्यायालयाच्या भूमिकेचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, "कालच उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, या अध्यादेशात कोणताही डिफेक्ट नाही. तसेच, चार जणांची मते वेगळी ठेवा आणि निवडणूक पूर्ण करा, असेही न्यायालयाने सांगितले आहे."
यावेळी सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या भूमिकेवर बोट ठेवताना मुख्यमंत्री म्हणाले, "मी अगदी खुलेपणाने सांगितले होते की, सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी जर एकत्र येत समोपचाराने निर्णय केला असता, तर आम्ही संचालक पाठवलेच नसते. मात्र, या सर्व प्रकरणाला जाणीवपूर्वक राजकीय रंग देण्यात आला. यात थेट राहुल गांधी सुद्धा उतरले." राहुल गांधी यांच्यावर कडक शब्दांत हल्लाबोल करत मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, "राहुल गांधी इतर देशांत सुरू असलेला प्रकार आता इथे करत आहेत. संविधानाने तयार केलेल्या संस्थांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे काम सुरू आहे," असा गंभीर आरोप त्यांनी केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.