Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगली सिव्हिलमध्ये रुग्णाचा अचानक गूढ मृत्यू : नातेवाईकांचा गोंधळ

सांगली सिव्हिलमध्ये रुग्णाचा अचानक गूढ मृत्यू : नातेवाईकांचा गोंधळसांगली : खरा पंचनामा

शहरातील सिव्हील हॉस्पिटलमध्ये अस्थीरोग विभागात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णाचा उपचारादरम्यान अचानक गूढ मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात चांगलाच गोंधळ घातला. भूलतज्ज्ञ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. या प्रकारामुळे सिव्हील हॅस्पिटलचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. त्या रूग्णाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. दरम्यान मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या प्रकाराबद्दल पत्रकारांनी सिव्हीलमधील संबंधित विभागाचे डॉक्टर तसेच वैद्यकीय अधीक्षक एकमेकांकडे बोट दाखवत असल्याचे स्पष्ट झाले.

याप्रकरणी चौकशीसाठी सिव्हिल प्रशासनाकडून तातडीने चार डॉक्टरांची समिती नियुक्त करण्यात आली असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यानंतरच नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. सांगली शहरातील एक व्यक्तीचा अपघात झाला होता. खांद्याला आणि डोक्याला मार लागला होता. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात तपासणी करून शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला. काल सकाळी दहाच्या सुमारास शस्त्रक्रियेसाठी त्याला भूल देण्यात आली. त्यानंतर अर्ध्या तासातच त्या रूग्णाची प्रकृती अत्यवस्थ झाली. ही बाब लक्षात आल्यानंतर संबंधित भूलतज्ज्ञ तसेच अन्य डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये पोहोचले. रूग्णाची तपासणी केल्यानंतर त्यांना उपचारासाठी अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. उपचारादरम्यान आज सकाळी त्या रुग्णाचा मृत्यू झाला.

दरम्यान, ही महिती नातेवाईकांना मिळाली. त्यांनी आक्रोश करत गोंधळ केला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा संशयही यावेळी व्यक्त करण्यात आला. सिव्हिलचे अधीष्ठाता डॉ. किशोर ननंदकर यांनी या प्रकाराची माहिती घेतली. विश्रामबाग पोलिसांनी सिव्हिलमध्ये धाव घेतली. रुग्णालय प्रशासनाने तज्ज्ञ डॉक्टरांची समिती गठीत केली. त्यांच्या अहवालानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन देण्यात आले.

सांगलीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीकांत अहंकारी म्हणाले, अस्थीरोग विभागात एक रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. काल शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती बिघडल्याने अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे.

दरम्यान त्या रूग्णाचा मृत्यू भूलीचा ओव्हरडोस दिल्याने झाल्याची चर्चा सिव्हील हॅस्पिटलमधील डॉक्टर आणि कमर्चाऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे त्या रूग्णाच्या मृत्यूला नेमके जबाबदार कोण असा प्रश्न आता नातेवाईक आणि नागरिकांकडून विचारला जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.