चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, पतीला तात्काळ अटक : विटा पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन खोऱ्याने तिच्या डोक्यात जबर मारहाण करत पत्नीचा खून करणाऱ्याला घटनेनंतर तात्काळ अटक करण्यात आली. विटा येथे गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. हल्लेखोर पतीला तातडीने ताब्यात घेतल्याची माहिती विट्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.
सिध्दाप्पा भिमाप्पा शिवगोंड (रा. जुना वासुंबे रोड, विटा, मूळ रा. शेगुंशी, जि. विजापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. भाग्यश्री सिध्दाप्पा शिवगोंड (वय 25) असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबत सुदीप बसवराज बनटे (वय 18) याने फिर्याद दिली आहे.
शिवगोंड दाम्पत्य मजुरीसाठी विटा शहरात वास्तव्यास आहे. सिध्दाप्पा हा वारंवार पत्नी भाग्यश्रीच्या चारित्र्यावर संशय घेत होता.
गुरुवारी दुपारी तो एकच्या सुमारास त्याच्या झोपडीत आला होता. त्यावेळी त्याने पत्नी भाग्यश्री हिला चारित्र्याचा संशय घेऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. नंतर त्याचा राग अनावर झाला.
त्याने तुझे कोणाबरोबर लफडे आहे सांग, नाहीतर तुला आज जिवंत सोडत नाही असे म्हणत तिच्या डोक्यात खोऱ्याने चार ते पाच वार केले. नंतर तो तेथून निघून गेला. त्यानंतर नागरिकांनी जखमी अवस्थेत भाग्यश्रीला रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री उशिरा तिचा मृत्यू झाला.
याप्रकरणी विटा पोलिसांनी सुरुवातीला खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. भाग्यश्रीचा मृत्यू झाल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान गुन्हा घडल्यानंतर विट्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी तातडीने सूत्रे फिरवून संशयित पतीला ताब्यात घेतले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.