पोलिस भरतीसाठी बोगस प्रमाणपत्र; सांगलीतील दोघांचा शोध सुरु
सोलापूर : खरा पंचनामा
सरकारी नोकरीच्या शोधातील तरुणांना शोधून त्यांना अंशकालीन व प्रकल्पग्रस्ताचे बनावट प्रमाणपत्र देणारी टोळी आता समोर येण्याची शक्यता आहे. चार लाख रुपये दिल्यावर आम्हाला प्रमाणपत्र मिळाल्याची कबुली सोलापूर पोलिसांच्या कोठडीतील नवप्रविष्ठ पोलिस शिपाई विकास चंद्रकांत मस्के व राहुल लिंबराज महिमकर यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
गृह विभागाच्या माध्यमातून नुकत्याच झालेल्या पोलिस भरतीत विकास मस्के व राहुल महिमकर या दोघांनी बीड तहसील कार्यालयातील अंशकालीन असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर केले होते. त्याआधारे त्यांना पोलिस भरतीत संधी देखील मिळाली.
अंतिम निवडीनंतर ते दोघेही धुळे येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात दाखल झाले. पण, गडचिरोली व पुणे शहर - ग्रामीण पोलिस भरतीत बनावट प्रमाणपत्राचा विषय समोर आल्यावर सोलापूर शहर पोलिसांनीही त्यादृष्टीने तपास केला. बीड तहसील कार्यालयाचे प्रमाणपत्र दिलेल्यांची चौकशी झाली. त्यावेळी हे दोघे बनावट प्रमाणपत्राद्वारे भरती झाल्याची बाब उघड झाली. त्यांच्याविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
सोलापूर पोलिसांच्या अटकेतील दोघांना हौसाजी देशमुख व पी. एल. देशमुख यांच्याकडून ती प्रमाणपत्रे मिळाली होती. आता पोलिसांनी त्या दोघांच्या शोधासाठी पथक रवाना केले आहे. स्थानिक पोलिसांकडूनही त्यांच्याबद्दल माहिती घेण्यात आली असून सध्या दोघेही फरार आहेत. गडचिरोली आणि पुणे शहर व ग्रामीणमध्येही असेच प्रकार समोर आल्यावर हौसाजीला अटक झाली होती. सध्या तो जामिनावर बाहेर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
परंतु, या बनावट प्रमाणपत्राच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार हौसाजी नसून दुसराच कोणीतरी असल्याचा संशय पोलिसांना आहे. कारण, त्या दोघांना बीडमध्ये नेऊन प्रमाणपत्र देण्यात आली होती. हौसाजी हा सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील असल्याचे सांगण्यात आले. त्याच्यासह दोघांचा सांगली जिल्ह्यात पोलिस शोध घेत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.