Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गोवा बनावटीच्या दारूच्या ४८ हजार बाटल्या जप्त, दोघांवर गुन्हा ७५.६० लाखांचा मुद्देमाल जप्त, पेठनाक्यावर इस्लामपूर पोलिसांची कारवाई

गोवा बनावटीच्या दारूच्या ४८ हजार बाटल्या जप्त, दोघांवर गुन्हा
७५.६० लाखांचा मुद्देमाल जप्त, पेठनाक्यावर इस्लामपूर पोलिसांची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणाऱ्यांचा पर्दाफाश करण्यात आला. पेठनाका येथे एका ट्रकमधून वाहतूक करण्यात येत असलेल्या गोवा बनावटीच्या ४८ हजार दारूच्या बाटल्यांचे एक हजार बॉक्स जप्त करण्यात आले. शिवाय दारूची वाहतूक करणारा ट्रक असा ७५.६० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी डफळापूर (ता. जत), कराड (जि. सातारा) येथील दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती इस्लामपूरचे पोलिस निरीक्षक संजय हारूगडे यांनी दिली. 

सल्लू ऊर्फ सलमान नजरूद्दीन मकानदार (वय २८, रा. डफळापूर, ता. जत) याला अटक करण्यात आली असून त्याच्यासह कराड येथील जमीर पटेल याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. बंगळूरू-पुणे महामार्गावर एका ट्रकमधून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी होणार असल्याची माहिती इस्लामपूरचे निरीक्षक श्री. हारूगडे यांना खबऱ्याद्वारे मिळाली. त्यानंतर त्यांनी एक पथक तयार करून मंगळवारी रात्री पेठनाका येथे नाकाबंदी केली होती. 

मिळालेल्या माहितीनुसार वर्णनाचा ट्रक (एमएच ५० एन ३९९९) आल्यानंतर पोलिसांनी तो अडवला. ट्रकची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये एक हजार बॉक्स आढळले. त्याची तपासणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटीच्या दारूच्या ४८ हजार बाटल्या सापडल्या. त्यानंतर पोलिसांनी ट्रक चालक सलमान मकानदार याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली. त्यावेळी त्याने गोव्याहून ही दारू आणली असून कराड येथील जमीर पटेल याला पोहोच करणार असल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. तसेच सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

इस्लामपूरचे पोलिस निरीक्षक संजय हारूगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक चेतन माने, उदय पाटील, विनायक देवळेकर, अभिजित पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली. 

मंत्र्यांच्या आदेशानंतरही राज्य उत्पादन शुल्कचे भरारी पथक कोमात
काही दिवसांपूर्वी पाटण तालुक्यात सातारा उत्पादन शुल्कच्या पथकाने दूध वाहतुकीच्या वाहनातून होणारी गोवा बनावटीच्या दारूची तस्करी उघडकीस आणली होती. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी राज्याच्या संचालकांच्या भरारी पथकाला गोवा बनावटीच्या दारूच्या तस्करीवर लक्ष ठेवून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मंत्र्यांनी आदेश देऊनही उत्पादन शुल्कच्या राज्याच्या भरारी पथकासह सिंधुदुर्ग येथील तपासणी नाक्यावरून एवढ्या मोठ्या प्रमाणात या दारूची तस्करी झालीच कशी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.