Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

फलटणमधील बलात्काराच्या गुन्ह्यात फरारीला अटक मोबाईल चोरीचाही गुन्हा उघड; सांगली पोलिसांची कारवाई

फलटणमधील बलात्काराच्या गुन्ह्यात फरारीला अटक
मोबाईल चोरीचाही गुन्हा उघड; सांगली पोलिसांची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

फलटण येथील बलात्काराच्या गुन्ह्यात सात महिन्यांपासून फरारी असलेल्या एकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून सांगलीतील मोबाईल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. त्याच्याकडून चोरीचे दोन मोबाईल जप्त करण्यात आल्याची माहिती सांगली शहरचे पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी दिली. 

रमेश शरण्या भोसले (वय २१, रा. अरारोळी मत्करवस्ती, बारामती) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सांगलीतील चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिस निरीक्षक देशमुख यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला सूचना दिल्या होत्या. सांगलीतील गणेश मार्केट येथे एकजण चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी आल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने तेथे पाहणी करून सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.  

त्याच्याकडील पिशवीची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये मोबाईल आढळून आले. त्याबाबत चौकशी केल्यानंतर त्याने ते दीड वर्षापूर्वी सांगलीतील जामवाडी येथून चोरल्याची कबुली दिली. शिवाय त्याची चौकशी केली असता त्याच्यावर फलटण पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल असून त्या गुन्ह्यात तो ७ महिन्यांपासून पसार असल्याचीही माहिती मिळाली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. 

पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पोवार, संदीप पाटील, श्रीपाद शिंदे, सचिन शिंदे, संदीप पाटील, गुंडोपंत दोरकर, संतोष गळवे, गौतम कांबळे, गणेश कांबळे, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.