Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कुपवाडमध्ये २८० कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त एकाला अटक, १४० किलोचा मुद्देमाल हस्तगत; पुणे, सांगली पोलिसांची संयुक्त कारवाई

कुपवाडमध्ये २८० कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त
एकाला अटक, १४० किलोचा मुद्देमाल हस्तगत; पुणे, सांगली पोलिसांची संयुक्त कारवाईसांगली ः खरा पंचनामा

पुण्यातील कुरकुंभ एमआयडीसीतील अर्थकेम कारखान्यावर छापा टाकून पुणे पोलिसांनी ६०० किलो एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. याचा तपास करत असताना पुणे क्राईम ब्रॅंचचे एक पथक सांगलीत पोहोचले. त्यांनी कुपवाड येथील स्वामी मळ्यातील एका घरावर छापा टाकून मिठाच्या पाकिटात लपवलेले १४० किलो एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत २४० कोटी रूपये असल्याचे सांगण्यात आले. पुणे क्राईम ब्रांच, सांगली एलसीबी आणि कुपवाड पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. तर दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. सांगलीत एवढ्या मोठ्या प्रमाणात एमडी हे महागडे ड्रग्ज सापडल्याने खळबळ उडाली आहे. 

आयुब अकबरशाह मकानदार (वय ४४, रा. बाळकृष्ण नगर, कुपवाड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी यापूर्वी पुण्यातील कारखान्याचा मालक साबळे, एक केमिकल इंजिनिअर यांच्यासह पाचजणांना यापूर्वी अटक केली आहे. त्याशिवाय पुणे पोलिसांनी दिल्ली, मुंबई, मीरा-भाईंदर, बंगळुरू, हैद्राबाद आदी ठिकाणीही छापे टाकून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केले आहे. याच प्रकरणात पुणे क्राईम ब्रॅंचचे एक पथक तपास करत सांगलीत आल्यानंतर कुपवाड येथे या ड्रग्जचा मोठा साठा असल्याची माहिती त्यांना मिळाली. 

पुणे पोलिसांनी सांगली एलसीबी आणि कुपवाड पोलिसांच्या मदतीने कुपवाड येथील आयुब मकानदार याच्या घरावर छापा टाकला. तेथे मिठाची अनेक पाकिटे सापडली. त्या पाकिटातील पावडरची तपासणी केल्यानंतर ते एमडी ड्रग्ज असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मकानदार याला अटक करण्यात आली. बुधवारी रात्री उशीरापर्यंत पोलिस घटनास्थळाचा पंचनामा करत होते. दरम्यान मकानदार याने स्वामी मळ्यात तीन हजार रूपये प्रति महिना एक छोटे घर भाड्याने घेतले होते. तेथे त्याने हा साठा ठेवल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे. दरम्यान संशयावरून आणखी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.  

पुणे क्राईम ब्रांचचे पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, सांगली एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, कुपवाड एमआयडीसीचे सहायक पोलिस निरीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. 

दोन ते तीन फेऱ्यांमध्ये आणले ड्रग्ज
मकानदार याच्याशी पुण्यातील एकाने जुन्या ओळखीतून संपकर् साधला होता. ड्रग्ज काही दिवस ठेवून घेण्यासाठी त्याला एक लाख रूपयेही देण्यात आले होते. पुण्यातील ड्रग्ज तस्करांच्या मध्यस्थाने छोटा हत्तीसारख्या वाहनांतून दोन ते तीन फेऱ्यांमध्ये हे ड्रग्ज कुपवाड येथे आणल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. शिवाय १५ दिवसानंतर हे ड्रग्ज पुन्हा पुण्याला नेण्यात येणार होते असेही सांगण्यात आले. मकानदार याला ड्रग्ज आणि पैसे पुरवणाऱ्याचा पुणे पोलिस शोध घेत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.