Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

संघ घेणार भाजप मंत्र्यांचा क्लास मोदी, शाह यांच्यानंतर मंत्र्यांना कानमंत्र, आज, उद्या बैठक

संघ घेणार भाजप मंत्र्यांचा क्लास
मोदी, शाह यांच्यानंतर मंत्र्यांना कानमंत्र, आज, उद्या बैठक



मुंबई : खरा पंचनामा 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिर्डीतील पक्षाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने भाजपच्या मंत्र्यांची बैठक घेऊन त्यांच्याबद्दलच्या अपेक्षा सांगितल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत महायुतीचे मंत्री, आमदारांचा क्लास घेतला होता. आता दोन दिवस रा.स्व. संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी भाजपच्या मंत्र्यांची बैठक घेऊन कानमंत्र देणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दोन्ही दिवस बैठकीला उपस्थित राहतील. राज्यात महायुतीचे सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सत्तारुढ झाल्यानंतर संघ आणि भाजपचे मंत्री यांची ही पहिलीच बैठक असेल. संघाच्या येथील यशवंत भवनात १८ आणि १९ जानेवारीला दिवसभर बैठक होणार आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार असताना रा. स्व. संघाने भाजपच्या मंत्र्यांची अशीच एक बैठक मुंबईत घेतली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे दहाच कॅबिनेट मंत्री होते. यावेळी भाजपचे १७ मंत्री आणि ३ राज्यमंत्री आहेत. या राज्यमंत्र्यांचे कॅबिनेट मंत्री हे शिंदेसेना किंवा अजित पवार गटाचे आहेत. अशावेळी त्या खात्यांमधील आपला अजेंडा राज्यमंत्र्यांमार्फत पुढे नेण्याचा संघाचा प्रयत्न असेल.

सूत्रांनी सांगितले की, संघाकडून मंत्र्यांनी कसा कारभार करावा या बाबतच्या अपेक्षा निश्चितपणे सांगितल्या जातील. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या सरकारचा कारभार पारदर्शक आणि प्रामाणिक असेल असे आधीच म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बडे जाव नको, साधे राहा असे मंत्र्यांना बजावले आहे. याच धर्तीवर संघ मंत्र्यांना उद्बोधन करेल, असे मानले जाते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.