मराठी माणूस दिल्लीच्या राजकारणात कमी पडतो !
छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी/नवी दिल्ली : खरा पंचनामा
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 'असे घडलो आम्ही' या विषयावर मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांचा सहभाग होता. त्यांच्याशी राजीव खांडेकर, प्रवीण बर्दापूरकर यांनी संवाद साधला.
दिल्लीतील राजकारणात दरबारी प्रवृत्ती आहे. इथे उगवत्या सूर्यालाच नमस्कार केला जातो. तरीही दिल्लीतील राजकारणाचा कार्य परिसर मोठा आहे. मराठी माणसाकडे कमी महत्त्वाकांक्षा आणि अल्पसंतुष्टता असल्याने मराठी माणूस दिल्लीच्या राजकारणात कमी पडतो, असे विचार माजी केंद्रीय मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
माझ्यातील लेखकाला शिक्षकांनी प्रोत्साहन दिले. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असताना सामाजिक विषमता दिसल्याने मी समाजकार्याकडे वळले. त्यातूनच पुढे राजकारणात स्थिरावले, असे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी स्पष्ट केले.
मला राजकारणाची मनापासून आवड होती. अनेक थोर राजकारणी वक्त्यांची भाषणे ऐकण्यात मला रस होता. परंतु प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश होईल, याचा मी कधी विचारच केला नाही. सामाजिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींमुळे आपल्या आयुष्याला वेगळे वळण लागले, अशा भावना माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केल्या.
दिल्लीतील राजकारणात मराठी माणूस मागेच - पृथ्वीराज चव्हाण
मी राजकीय कुटुंबातून आलो असलो तरी घरातील शिक्षणाचे संस्कार माझ्यात रुजले होते. त्यामुळेच उच्च शिक्षण पूर्ण केल्याशिवाय मी राजकारणाकडे वळलो नाही. माझे प्राथमिक शिक्षण कराडच्या नगरपालिकेच्या शाळेत झाले. पुढे वडील खासदार झाल्यामुळे आमचे वास्तव्य दिल्लीतच राहिले. तेथे पहाडगंज येथील नूतन मराठी विद्यालयाच्या शाळेत मला आठवी ऐवजी सातवीत प्रवेश मिळाला, कारण दोन्हीकडील शिक्षणामध्ये खूप तफावत होती. तेव्हापासूनच योग्यतेपेक्षा एक पायरी खाली संधी मिळणे नशिबी आले. दिल्लीतील राजकारणी इरसाल असतात. त्यांच्याबरोबर व्यवहार करताना मराठी माणसाचे वेगळेपण महत्त्वाचे ठरते. परंतु मराठी माणसाकडे महत्वाकांक्षेची कमतरता असल्यामुळे तसेच तो अल्पसंतुष्टही असल्यामुळे केंद्रीय राजकारणात मराठी आवाज घुमला नाही. या उलट उत्तरेकडे सगळे राजकीय नेते दिल्लीत राहतात आणि केंद्रीय राजकारणच करतात.
द्विध्रुवीकरणामुळे राजकारणात प्रवेश : डॉ. नीलम गोऱ्हे
मला लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. माझे शिक्षण मुंबईतील महानगरपालिकेच्या शाळेत झाले. तसेच साने गुरुजी विद्यालय आणि नंदादीप विद्यालयात शिक्षकांच्या प्रोत्साहनामुळे मी लिहायला लागले. सातवीत असताना मी काव्य केले. व्यक्त होण्यासाठी मी लिहिती झाले. पुढे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असताना विविध सामाजिक चळवळींशी जोडली गेले. तेव्हापासूनच समाजातील सर्वच क्षेत्रात तफावत, जातीभेद, स्त्री-पुरुष भेद मनाला जाणवत होता. अत्याचार घडल्यानंतर कृती करण्याऐवजी तो होऊच नये याकरिता मी आंदोलनांमध्ये सहभागी होऊ लागले. विद्या बाळ, माधव गडकरी आदींच्या प्रेरणेतून कार्यप्रेरित झाले आणि पुन्हा एकदा लिहिती झाले. याच प्रेरणेतून कार्यप्रेरित झाले आणि पुन्हा एकदा लिहिती झाले. याच काळात राजकीय द्विध्रुवीकरण घडत होते.
मधु दंडवते यांच्या पराभवाचा सल कायम राहणार - सुरेश प्रभू
व्यक्तीगत आयुष्यात मला मधु दंडवते, भाई वैद्य अशा नेत्यांविषयी मनःपूर्वक आदर आहे. मधु दंडवते यांच्याविरुद्ध निवडणूक लढणे ही माझ्या आयुष्यातील घोडचूक आहे. ते जर निवडून आले असते तर त्यावेळच्या राजकीय परिस्थितीमुळे पंतप्रधानपदी मराठी माणूस विराजमान होऊ शकला असता. मी निवडून आल्यापेक्षा मधु दंडवते हरले याचे दुःख माझ्या मनात कायमच राहणार आहे. मला बाळासाहेब ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांची भाषणे ऐकण्याची आवड होती. एका प्रसंगी बाळासाहेब ठाकरे यांनी माझे भाषण ऐकले तेव्हाच त्यांनी मला सांगितले की, आमचे सरकार आले तर तुलाच अर्थमंत्री करणार. बाळासाहेब यांचा मोठेपणा एवढा की, त्यांनी मला खरेच मंत्री केले. राजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही मी केंद्रीय मंत्री झालो. माझ्या राजकीय कारकिर्दीकरिता बाळासाहेब ठाकरे, जॉर्ज फर्नांडिस, लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी यांच्या मनाचा मोठेपणा कारणीभूत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.