अनैतिक संबंधाच्या संशयाने चिरला पत्नीचा गळा
हल्लेखोर पतीला अटक, सांगली शहर पोलिसांची अवघ्या काही तासात कारवाई
सांगली : खरा पंचनामा
शहरातील कृष्णा काठावरील सरकारी घाटावर पत्नीचा खून करून पसार झालेल्या संशयित पतीला अटक करण्यात आली आहे. सांगली शहरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी तातडीने हालचाली करत खूनानंतर अवघ्या काही तासात खूनी पतीला अटक केली आहे. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून त्याने पत्नीचा खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
प्रियांका जकाप्पा चव्हाण (वय २८, सध्या रा. सांगलीवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर जकाप्पा सोमनाथ चव्हाण असे अटक केलेल्या संशयित पतीचे नाव आहे. जकाप्पा आणि प्रियांका यांचा काही वर्षापूर्वी विवाह झाला होता. जकाप्पा हा मूळचा विजापूर येथील आहे. त्यांना एक मुलगा, मुलगी आहे. जकाप्पा रत्नागिरी येथील खाणीत काम करतो. दीड महिन्यांपूर्वी त्यांच्यात वाद झाल्यानंतर प्रियांका सांगलीवाडी येथे आईकडे रहात होती. ती शहरातील एका साडीच्या दुकानात काम करत होती.
रविवारी रात्री जकाप्पा याने बोलण्याचा बहाणा करून प्रियांकाला कृष्णा काठावरील सरकारी घाटावर घेऊन गेला. तेथे तिच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन त्याने धारदार शस्त्राने तिच्या गळ्यावर वार केले. ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर तो तेथून निघून गेला. घटना घ़डल्यानंतर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय मोरे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी स्वतः तपासाची सूत्रे हाती घेतली. शहर पोलिसांचे पथक त्याला शोधत होते. मध्यरात्रीच निरीक्षक मोरे यांना माहिती मिळाल्यानंतर अवघ्या काही तासात सांगलीजवळच्या गावातून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या प्राथमिक चौकशीत अनैतिक संबंधाच्या संशयातून खून केल्याचे स्पष्ट झाले.
सांगली शहरचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक महादेव पोवार, संतोष गळवे, संदीप पाटील, गौतम कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.